Khasdar Krida Mahotsav 2020: नागपूर येथे खासदार क्रीडा महोत्सवात सनी देओल आणि नितीन गडकरी यांची उपस्थिती; 38 हजार खेळाडू होणार सामील
Khasdar Krida Mahotsav 2020 opening ceremony (Photo Credits: @chakdenagpur/Facebook)

पंजाबच्या गुरदासपूर येथील भाजप खासदार (BJP MP) व बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) यांनी, रविवारी नागपुरातील (Nagpur) आरएसएस मुख्यालयात हजेरी लावली. या दरम्यान त्यांनी ‘राष्ट्रीय युवा दिन’च्या निमित्ताने खासदार क्रीडा महोत्सवात (Khasdar Krida Mahotsav) भाग घेतला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे देखील उपस्थित होते.

हा महोत्सव 24 जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून त्यामध्ये 32 खेळांसाठी, 38 हजार खेळाडू सहभागी होत आहेत. याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातही सनी देओल यांना अनेक वेळा पाहिले गेले आहेत. खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हा क्रीडा महोत्सव साकारला गेला आहे.

खासदार क्रीडा महोत्सवाच्या तिसऱ्या पर्वाचे उद्घाटन, कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी कुस्तीपटू बबिता फोगट आणि अभिनेते व खासदार सनी देओल यांच्या प्रमुख उपस्थिती 12 जानेवारी रोजी यशवंत स्टेडियमवर पार पडले. यावेळी नितीन गडकरीही उपस्थित होते. शहरातील खेळाडूंना खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळावे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध खेळांत त्यांना उत्तम कामगिरी करता यावी, या उद्देशानेच खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले गेले आहे.

महोत्सवाचे उद्घाटन -

अशा प्रकारच्या महोत्सवाद्वारे नागपूरला ‘स्पोर्ट्स सिटी’ बनवण्याचा मानस असल्याचे गडकरी यांनी सांगितले. या महोत्सवातील विजेत्यांना जवळजवळ 78 लाखांपर्यंतची बक्षिसे देण्यात येणार आहेत. (हेही वाचा: भाजपा खासदार सनी देओल हरवले; गुरदासपूर मतदारसंघातील पठाणकोट शहरात लागले पोस्टर)

दुसरीकडे गुरदासपूर येथील आपल्या लोकसभा मतदारसंघात खूप दिवसांपासून सनी देओल यांचे दर्शन झाले नाही. यामुळे मतदारसंघात ते बर्‍याच दिवसांपासून बेपत्ता असल्याचे पोस्टर्स लावले गेले आहेत. आपल्या संसदीय मतदार संघात ते न गेल्याबद्दल विरोधी पक्षाने अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. आता नागपूरच्या खासदार क्रीडा महोत्सवात सामील होण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे, मात्र आपल्या मतदारसंघातील लोकांना ते भेटत नाहीत यामुळे त्यांच्यावर टीकाही होत आहे.