Shweta Ratanpura (Photo Credits: Twitter)

सातासमुद्रापार रशिया (Russia) मध्ये आयोजित करण्यात आलेल्या 45व्या वर्ल्ड स्किल्स कझान (World Skills Kazan 2019) स्पर्धेत महाराष्ट्राची 22 वर्षीय श्वेता रतनपूर (Shweta Ratanpura) हिने ग्राफिक डिझाइंनिंग (Graphic Designing) स्पर्धेत कांस्य पदक (Bronze Medal)  मिळवत वर्ल्ड स्किल्स स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला बनण्याचा मान प्राप्त केला आहे. याशिवाय भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य आणि तब्बल 15 उत्कृष्ठ सादरीकरणाची पदके अशा तब्बल 19 पदकांवर आपले नाव कोरून 63 देशांमधून 13 व्या स्थानी येण्याचा बहुमान पटकावला आहे.

प्राप्त माहितीनुसार, या स्पर्धेत एकूण 63 देशांमधील 1350 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आपल्या कौशल्याच्या बळावर भारतीय संघाने हा विजय मिळवला. यामध्ये ओडिशाच्या अश्वथ नारायण (Ashwath Narayan) याला पाण्यापासून तंत्रज्ञान या विषयावरील प्रकल्पासाठी एक सुवर्ण पदक, प्रणव नुतलपट्टी (Pranav Nutalpatti) याला वेब तंत्रज्ञान विषयात रौप्य पदक तर पश्चिम बंगालच्या संजय प्रमाणिक (Sanjay Pramanik) याला ज्वेलरी व महाराष्ट्राच्या श्वेता रतनपूरा हिला ग्राफीक डिझाईनिंग स्पर्धेत कांस्य पदके प्राप्त झाली आहेत.

पहा ट्विट

दरम्यान, कौशल्य विकास मंत्रालयाने याबाबत माहिती देत कझान रशिया येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड स्किल्स स्पर्धेत देशाचे नाव गौरवत 19 पदके मिळवण्यासाठी भारतीय संघातील 48 स्पर्धकांचे कौतुक केले आहे. यापूर्वी 2007 मध्ये सुद्धा भारताने या स्पर्धेत सहभाग घेत उत्कृष्ट सादरीकरणासाठी एक रौपय एक कांस्य व अन्य 9 पदके मिळवली होती, पण यंदाचा विजय हा बराच मोठा व आता पर्यंतचा सर्वात कौतुकास्पद ठरला आहे.