सुनील गावस्कर (Photo Credit: IANS)

आपीएलच्या 13 व्या सीजनमधील 6 वा सामना काल (24 सप्टेंबर) किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात रंगला. या सामन्यात बंगलोरचा संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) लवकर आऊट झाला आणि त्याने दोन कॅचेसेही सोडल्या. त्यावर कॉमेंटरी करताना प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) बद्दल टिप्पणी केल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर आता नेटकरी भडकले असून त्यांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. (किंग्स इलेव्हनची 'बल्ले-बल्ले'! फिरकी गोलंदाजीसमोर RCB फलंदाजांचे लोटांगण, पंजाब 97 धावांनी विजयी)

विरुष्काच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे अत्यंत चुकीचे आहे, असे काहींचे म्हणणे आहे. तर काही गावस्कर यांना कॉमेंटरी पॅनलवरुन काढून टाकण्याच्या मागणी बीसीसीआयकडे करत आहेत. तसंच विराटच्या कामगिरीवरुन अनुष्काला बोल लावणे यातून भारतीय मीडियाची मानसिकता दिसून येत असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. यापूर्वी देखील अनेकदा विराटच्या मैदानावरील वाईट कामगिरीबद्दल अनुष्का शर्मा हिला जबाबदार ठरवण्यात आले होते. तसंच सोशल मीडियावरही अनेकदा यावरुन अनुष्काला ट्रोल करण्यात येते. दरम्यान, अनुष्का शर्मा प्रेग्नेंट असून लवकरच विरुष्काच्या घरी नवा पाहुण्याचे आगमन होणार आहे.

पहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया:

काल झालेल्या सामन्यात विराट कोहलीने किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार के.एल. राहुल याचा झेल 17 व्या आणि 18 व्या ओव्हरमध्ये असा दोनदा सोडला. त्यानंतर के.एल. राहुलने 69 चेंडूत 132 धावा करुन पंजाब संघाची स्थिती मजबूत केली. पंजाबने दिलेल्या 207 धावांचे लक्ष्य गाठताना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाची पुरती वाट लागली. RCB ने केवळ 109 धावांत आपला गाशा गुंडाळला. या दारुण पराभवाची जबाबदारी कर्णधार विराट कोहली याने आपल्या खांद्यावर घेतली आहे.