भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली (Sourav Ganguly) यांनी सोमवारी सांगितले, भारतीय संघाला 30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या वनडे विश्वचषक स्पर्धेत (ICC Cricket World Cup 2019) ऋषभ पंतची (Rishabh Pant) उणीव भासेल. या संघामध्ये निवड समितीने ऋषभ पंतची निवड केली नाही. पंतने नुकतेच आयपीएल 12 मध्ये दिल्ली कॅपिटलसाठी खेळत दमदार प्रदर्शन केले होते. पंतच्या मदतीनेच सहा हंगामांनंतर संघाने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते. सौरभ गांगुली या पर्वात दिल्ली संघाचे सल्लागार होते.
यावेळी सौरभ गांगुली म्हणाले, ‘विश्वचषक स्पर्धेत पंतची चांगलीच उणीव भासेल.’ जेव्हा त्यांना केदार जाधव ऐवजी ऋषभ पंतला संघात सामील केले जावे का? असे विचारले असता त्यांनी सांगितले, ‘असे करणे योग्य ठरणार नाही. आशा आहे की केदार लवकरच ठीक होईल, मात्र संघाला ऋषभची कमतरता नक्कीच भासेल.’
दरम्यान, रोहित शर्माने रविवारी चौथ्यांदा आयपीएलच्या जेतेपदाचा किताब मुंबई इंडियन्सला मिळवून दिला. रोहितच्या कर्णधारपदाबाबत गांगुली म्हणाले, ‘तो सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. मुंबई आणि चेन्नई दोन्ही खूप चांगले संघ आहेत. आम्हीदेखील चांगले खेळण्याचा प्रयत्न केला, पण अंतिम फेरीत पोहचू शकलो नाही.’