Mumbai चा माजी खेळाडू Abhishek Nayar ची क्रिकेट मधून निवृत्ती; आता Coaching वर भर देण्याचं लक्ष्य
Abhishek Nayar Retires | (Picture Credit: Getty)

भारतीय संघाकडून खेळलेल्या मुंबईच्या माजी क्रिकेटपटू अष्टपैलू अभिषेक नायरने (Abhishek Nayar) आज क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. 36 वर्षीय अभिषेक नायरने आता खेळण्यासाठी कुठल्याही प्रकारची प्रेरणा शिल्लक राहिली नसल्याने हा निर्णय घेत असल्याचं जाहीर केलं. अभिषेक नायर तब्बल 99 प्रथम श्रेणी सामने खेळला आहे.

निवृत्तीच्या निर्णयाबाबत विचारले असता अभिषेक नायर म्हणाला, ''मी या गोष्टीचा गेले बरेच दिवस विचार करतो आहे. जेव्हा उच्च स्तरावर खेळण्यासाठी तुम्हाला संधी उपलब्ध होण्याची शक्यता कमी असते, तेव्हा त्यापेक्षा एखाद्या होतकरू खेळाडूसाठी संघातील तुमचं स्थान सोडणं हे श्रेयस्कर असतं. "

रोहित शर्मा (Rohit Sharma), दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) सारख्या अनेक खेळाडूंना वेळोवेळी वैयक्तिक पातळीवर मदत केलेल्या नायरने आता कोचिंग वर आपलं लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या कोचिंग स्टाफ मध्ये असलेल्या नायरकडे त्यांच्या अकादमीचं नेतृत्व आहे. तसेच या वर्षी तो संघाच्या सहाय्यक कोचच्या भूमिकेत असेल.

(हेही वाचा. Rohit Sharma ने शेअर केला लेक समायरा सोबत मस्ती करतानाचा सुपरक्युट व्हिडिओ)

मुंबईच्या लिजंड लोकांच्या पंक्तीत बसू शकेल अशी कारकीर्द डावखुरा फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज असलेल्या नायरची आहे. नायरने मुंबईकडून 95 सामने खेळले. पण 2017-18 मध्ये त्याला संघातून वगळण्यात आले. त्यानंतर तो पॉंडिचेरी कडून 4 सामने खेळला. 2009 साली नायरला भारतीय संघात सुद्धा स्थान मिळाले होते. 2009 चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय चमूत तो होता. पण 3 च सामन्यात संधी मिळालेल्या नायरला संघातलं आपलं स्थान मजबूत करता आलं नाही.