
ENG vs WI 1st Test 2020: कोरोना संकटामुळे सुमारे 4 महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट ठप्प होते. कोरोनानंतर तब्बल 4 महिन्यांनंतर प्रथमच खेळवण्यात आलेल्या सामन्यात अखेर वेस्ट इंडिजने (West Indies) बाजी मारली आहे. 8 ते 12 जुलैदरम्यान झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजने इंग्लंडवर (England) 4 गडी राखून विजय मिळवला आहे. इंग्लंडने सामन्याच्या पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजपुढे विजयासाठी 200 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग करत वेस्ट इंडिज इंग्लंडवर थरारक विजय मिळवला आहे. जेरमिन ब्लॅकवूड हा वेस्ट इंडिजच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. त्याने 95 धावांची खेळी करत वेस्ट इंडिजच्या संघाला 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली आहे.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 204 धावा केल्या होत्या. तर प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 318 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे वेस्ट इंडिजकडे पहिल्या डावाअखेरीस शतकी आघाडी होती. त्यानंतर इंग्लडंच्या दुसऱ्या डावात सिबलीने (५०) अर्धशतकी खेळी केली. डेन्टलीनेही 29 धावा केल्या. त्यानंतर क्राव्हलीने डाव सांभाळत स्टोक्सला साथ दिली.दरम्यान, दोघांनी मिळून 98 धावांची भागीदारी केली. त्यानंतर हे दोघेही एकापाठोपाठ बाद झाले. क्राव्हलीने 76 तर स्टोक्सचेही (46) अर्धशतक हुकले. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या जोफ्रा आर्चरने काही काळ झुंज दिली. परंतु, इतर फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे इंग्लंडच्या संघाला 313 धावांचा डोंगर उभारता आला होता. वेस्टइंडिजच्या संघाकडून गोलंदाजी करत असताना गॅब्रियलने 5, होल्डर-चेसने प्रत्येकी 2 तर, होल्डरने 1 गडी बाद केला आहे. हे देखील वाचा- COVID-19: 'मला आशा आहे की, तुम्ही लवकरच बरे व्हाल' बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाठी पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद अफरीदी याचे ट्विट
आयसीसीचे ट्विट-
Windies win by 4 wickets!#ENGvWI pic.twitter.com/uD7ax9pgwF
— ICC (@ICC) July 12, 2020
इंग्लंडने दिलेल्या 200 धावांचा पाठलाग करण्यासाठी वेस्टइंडिज संघ शेवटच्या दिवशी मैदानात उतरला होता. परंतु, क्रेग ब्रेथवेट, शाय होप आणि ब्रूक्स हे तिघे एकेरी धावसंख्येवर माघारी परतले. पहिला गडी बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजला अजून एक धक्का बसला होता. पण वेस्ट इंडिजच्या जेरमिन ब्लॅकवूड हा या विजयाचा नायक ठरला आहे. कारण आर्चर भेदक गोलंदाजी करत असताना ब्लॅकवूड हा खेळपट्टीवर ठाण मांडून राहीला आणि संघाकडून सर्वाधिक धावा करत संघाला पहिला विजय मिळवून दिला. यावेळी ब्लॅकवूडला रोस्टन चेसने (37), चांगली साथ दिली. कारण, या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी रचली. ही भागीदारी वेस्ट इंडिजच्या विजयासाठी निर्णायक ठरली. ब्लॅकवूडने यावेळी 12 चौकारांच्या मदतीने 95 धावांची दमदार खेळी साकारत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. पण त्याला शतकही झळकावता आले नाही. तसेच त्याला संघाला विजयावर शिक्कामोर्तबही करून देता आले नाही.