IPL In UAE 2021: आयपीएलसाठी दिल्ली कॅपिटल्सची टीम पोहोचली यूएईमध्ये, 22 सप्टेंबरला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार पहिला सामना
दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (IPL) सीझन 14 च्या उर्वरित सामन्यांसाठी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघ यूएईला (UAE) पोहोचला आहे. संघाच्या अधिकाऱ्यांसह, दुबईला जाणाऱ्यांमध्ये संघाचे देशांतर्गत खेळाडूंचा समावेश आहे. श्रेयस अय्यर आधीच दुबईत उपस्थित असताना स्टार खेळाडू अमित मिश्राही (Amit Mishra) टीमसोबत पोहोचला आहे. फ्रँचायझीने इन्स्टाग्रामवर एका व्हिडिओसह दुबईला (Dubai) पोहोचण्याची माहिती दिली. लेग स्पिनर अमित मिश्रा याने विमानतळावर पीपीई किटमध्ये स्वत: चे एक छायाचित्र सोशल मीडियावर 'एनराउट दुबई' कॅप्शनसह पोस्ट केले. मात्र, संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) 15 सप्टेंबर रोजी थेट इंग्लंडहून यूएईला पोहोचेल. दिल्ली कॅपिटल्स आठ सामन्यांत 12 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. त्यांचा सामना 22 सप्टेंबर रोजी दुबईत सनरायझर्स हैदराबादशी (Sunrisers Hyderabad) होणार आहे.

प्लेऑफमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे आगमन जवळपास निश्चित दिसते. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला आणखी दोन सामने जिंकणे आवश्यक आहे. दिल्लीचा फलंदाज श्रेयस अय्यर आधीच सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे यांच्यासोबत दुबईला पोहोचला होता. अय्यरला मार्चमध्ये पुण्यात इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे दरम्यान क्षेत्ररक्षण करताना खांद्याच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून वगळण्यात आले होते पण आता तो तंदुरुस्त आहे. अय्यर कर्णधार पदावर परतणार की ऋषभ पंत कर्णधार राहील हे अद्याप ठरलेले नाही. मात्र, पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे.

नवी दिल्ली आणि अहमदाबादमध्ये कोविड 19 साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे बायो बबलचा फटका बसला. यामुळे आयपीएल 2021 मे मध्ये पुढे ढकलण्यात आले. आयपीएलचा दुसरा हंगाम 19 सप्टेंबरपासून दुबईत सुरू होईल. पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होईल.आयपीएल थांबण्यापूर्वी 29 सामने खेळण्यात आले होते. 

कोलकाता नाईट रायडर्सचे वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांनी विषाणूसाठी सकारात्मक चाचणी आली होती. ज्यामुळे बीसीसीआयला आयपीएलला स्थगिती द्यावी लागली होती. मात्र आता उर्वरित स्पर्धा यूएईमध्ये हलवावी लागली आहे. आता उर्वरित 31 सामने 27 दिवसांच्या कालावधीत खेळले जातील. याआधी मुंबई इंडियन्स आणि सीएसके टीम यूएईमध्ये पोहोचले आहेत. आयपीएलच्या या दुसऱ्या टप्प्यातील 13 सामने दुबई, 10 सामने शारजाह, तर 8 सामने आबूधाबीमध्ये होणार आहेत.