BAN vs ZIM Test 2021: 150 धावांची तडाखेबाज खेळीनंतर ‘या’ बांग्लादेशी अष्टपैलूने केली निवृत्तीची धक्कादायक घोषणा
महमूदुल्लाह (Photo Credit: Twitter)

BAN vs ZIM Test 2021: बांग्लादेशचा (Bangladesh) अष्टपैलू महमूदुल्लाने (Mahmudullah) झिम्बाब्वेविरुद्ध (Zimbabwe) सुरु असलेल्या एकमेव कसोटी सामन्यानंतर टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होण्याची अचानक आणि धक्कादायक घोषणा केली. ESPNcricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार हरारे येथे तिसर्‍या दिवसाचा खेळ संपल्यानंतर महमूदुल्लाने आपल्या सहकाऱ्यांपुढे ही घोषणा केली. महमुदुल्लाहने टेलेंडर तस्कीन अहमद (Taskin Ahmad) याच्यासोबत 191 धावांची भागीदारी केली. त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट नाबाद 150 धावा ठोकल्या ज्याने बांग्लादेश सामन्यात विजयी स्थितीत नेऊन ठेवले. तो कसोटी सामन्यानंतर लवकरच त्याच्या सोशल मीडिया अकाउंट व बोर्डाकडे अधिकृतपणे याची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे. सध्या झिम्बाब्वे विरोधात सुरू असलेला कसोटी सामना त्याच्या कारकिर्दीतील 50 वा सामना असून त्याने एक वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. (Video: बांग्लादेशी फलंदाजाने दाखवल्या डान्स मूव्हज; क्रिकेटच्या मैदानावर गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये शाब्दिक बाचाबाची; BAN विरुद्ध ZIM सामन्या दरम्यानची घटना)

तिसर्‍या दिवसाच्या शेवटी बांग्लादेशने दुसर्‍या डावात 237 धावांनी आघाडी मिळवली आहे. पहिल्या डावात झिम्बाब्वेने 468 धावांपर्यंत मजल मारल्यानंतर यजमान संघ पहिल्या डावात 276 धावांवर ऑलआऊट झाला होता. एका बातमीनुसार, महमूदुल्लाने आपल्या संघातील खेळाडूंना सांगितले आहे की, आता त्याला कसोटी क्रिकेट खेळायचे नाही. त्याच्या या निर्णयामुळे टीम मॅनेजमेंट आणि खेळाडू सर्वच हैराण झाले असून त्याने अचानक हा निर्णय का घेतला याबद्दल टीम मॅनेजमेंट त्याच्याशी चर्चा करेल. बीसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या सामन्यानंतर आपल्याला यापुढे कसोटी क्रिकेट खेळायचे नाही, असे महमूदुल्लाने आम्हाला सांगितले आहे. परंतु त्याने अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितले नाही, म्हणूनच त्याने हा निर्णय भावनिक न घेतल्यास आम्हाला हे जाणून घेण्यास आवडेल.

महमूदुल्लाने आतापर्यंत बांग्लादेशकडून 50 कसोटी सामन्यांमध्ये 31.77 च्या सरासरीने 2914 धावा केल्या आहेत. त्याने 5 शतके आणि 16 अर्धशतके ठोकली आहेत व 43 विकेट्स घेतल्या आहेत. महमूदुल्लाने लिटन दाससह 7 व्या विकेटसाठी 138 धावा आणि 9 व्या विकेटसाठी तस्कीन अहमदबरोबर एकूण 191 महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या कसोटी सामन्याद्वारे महमूदुल्लाने 18 महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले असून गेल्यावर्षी त्याने पाकिस्तानविरुद्ध रावळपिंडीमध्ये शेवटची कसोटी खेळली होती.