ZIM vs BAN ODI 2021: झिम्बाब्वेच्या Brendon Taylor ने स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड, बांग्लादेशविरुद्ध कर्णधाराच्या विकेटचा व्हिडिओ पाहून डोक्यावर माराल हात
ब्रेंडन टेलर विकेट (Photo Credit: Twitter)

ZIM vs BAN 2nd ODI: हरारे (Harare) येथील हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर सुरू असलेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार ब्रेंडन टेलर (Brendan Taylor) याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार ब्रेंडन टेलर 57 चेंडूत 46 धावा काढून बाद झाला. पण टेलर ज्या पद्धतीने बाद झाला त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार विचित्र पद्धतीने बाद झालाजे पाहून सर्वच चकित झाले. बांग्लादेश संघ  (Bangladesh Team) सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर (Zimbabwe Tour) असून कसोटी मालिकेनंतर बांग्लादेशने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. म्हणजेच आजचा सामना यजमान झिम्बाब्वेसाठी करो-या-मरोचा आहे. (Video: बांग्लादेशी फलंदाजाने दाखवल्या डान्स मूव्हज; क्रिकेटच्या मैदानावर गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये शाब्दिक बाचाबाची; BAN विरुद्ध ZIM सामन्या दरम्यानची घटना)

झिम्बाब्वेचे दोन्ही सलामी फलंदाज 33 धावांवर माघारी परतल्यावर चौथ्या क्रमांकावर संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज व कर्णधार टेलर फलंदाजीसाठी उतरला. त्याने आधी चकब्वा व त्यानंतर मायर्ससोबत संघाचा डाव सावरला आणि संघाला 24 ओव्हरमध्ये 111 धावांपर्यंत मजल मारून दिली. यादरम्यान, शरिफुल इस्लाम डावातील 25 वी ओव्हर टाकण्यासाठी आला. त्याने ओव्हरमधील दुसरा चेंडू बाउन्सर टाकला जो टेलरने खेळला नाही. मात्र, त्यानंतर तो पुढे येत असताना त्याची बॅट मागे स्टंपला लागली. अशाप्रकारे तो वैयक्तिक 46 धावांवर हिटविकेट होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दुसरीकडे, झिम्बाब्वेने आजच्या निर्णायक सामन्यात 50 ओव्हरमध्ये 240 धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली. यजमान संघासाठी वेस्ले मधेव्हरेने सर्वाधिक 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच कर्णधार टेलरने 45 तर, अनुभवी सिकंदर रझाने 30 धावांचे योगदान दिले. शिवाय, बांग्लादेशकडून युवा वेगवान गोलंदाज शरिफुल इस्लामने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. झिम्बाब्वे दौर्‍यावर बांग्लादेशने एकमेव कसोटी सामना जिंकला. त्याचबरोबर पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे स्थगित करण्यात आला. दुसर्‍या वनडे सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.