मुंबईच्या क्रिकेट संघाने रणजी करंडकातील बडोद्याविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत पहिल्या दिवसअखेरीस 5 बाद 248 धावा फटकावल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेची अपयशाची मालिका याही डावात कायम राहिली. मुशीर खानच्या नाबाद 128 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईच्या संघाने दोनशे धावांचा आकडा पार केला. (हेही वाचा - R Ashwin New Record: आर अश्विनने विकेट्सचे शतक झळकावले, इंग्लंडविरुद्ध केली 'ही' मोठी कामगिरी)
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ व भूपेन लालवानी या फॉर्ममध्ये असलेल्या जोडीने 57 धावांची पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप केली. पृथ्वी शॉ 33 धावांवर बाद झाला आणि जोडी तुटली. कर्णधार अजिंक्य रहाणे या सामन्यात देखील अपयशी ठरला. 13 चेंडूंचा सामना करणाऱ्या अजिंक्य रहाणेला तीनच धावा करता आल्या. शम्स मुलानीही अवघ्या 6 धावांवर बाद झाला. मुशीर खान व सूर्यांश शेडगे या जोडीने 52 धावांची भागीदारी करताना डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
मुंबईचा संघ 5 बाद 142 धावा अशा संकटात सापडला. अशा वेळी मुशीर खान व हार्दिक तामोरे या जोडीने 106 धावांची भागीदारी करीत डाव सावरला. मुशीर खान याने 216 चेंडूंमध्ये 10 चौकारांसह नाबाद 128 धावांची खेळी साकारली. हार्दिक तामोरे 30 धावांवर खेळत आहे. एकीकडे सर्फराज खानने आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण करताना चांगली खेळी केली तर दुसरीकडे त्याच्या लहान भावाने फर्स्ट क्लास क्रिकेटच्या आपल्या पहिल्याच सामन्यात शतक करत एक विक्रम रचला आहे.