स्मृती मंधाना (Photo Credit: Twitter/ICC)

शनिवारी मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या तिरंगी मालिकेत भारत (India)-ऑस्ट्रेलिया (Australia) महिला संघाच्या पाचव्या सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन शिल्लक असताना सात विकेटने विजय मिळवला. नाणेफेक गमावल्यावर पहिले फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया महिला संघाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये पाच गडी गमावून भारतासमोर 174 धावांचे लक्ष्य ठेवले होते. संघासाठी एशले गार्डनर (Ashleigh Gardner) ने 57 चेंडूत 11 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने सर्वाधिक अर्धशतकी डाव खेळला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध या विजयाने भारताच्या फायनलमध्ये पोहचण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या सर्वाधिक धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात भारताची सलामी जोडी स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि शैफाली वर्मा (Shafali Verma) यांच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर टीमने अखेरच्या षटकात तीन गडी गमावून विजय मिळवला. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने त्यांच्या सर्वात मोठ्या धावसंख्येचा विक्रम रचला.

यापूर्वी, लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरूद्ध 168/3 धावा केल्या. या प्रकरणातील विश्वविक्रम इंग्लंडचा आहे, ज्याने 2018 मध्ये भारतीय संघाचा पराभव केला. इंग्लंडने भारतविरुद्ध 199/3 धावांच्या रेकॉर्डची नोंद केली आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात दीप्ती शर्मा ने भारताकडून सर्वाधिक दोन गडी बाद केले. दीप्ती व्यतिरिक्त राजेश्वरी गायकवाड, राधा यादव आणि हर्लीन देओल यांना प्रत्येकी एक यश मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात भारतासाठी सलामी फलंदाज स्मृतीने 48 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. मंधानाशिवाय शेफालीने 28 चेंडूत आठ चौकार आणि एका षटकारासह 49, जेमिमा रॉड्रिग्जने 19 चेंडूत पाच चौकारांसह 30, कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) 20 चेंडूत नाबाद 20 धावा केल्या. दीप्ती दोन चौकारांच्या मदतीने चार चेंडूंमध्ये 11 धावा करून नाबाद परतली.

तिरंगी मालिकेतील चार सामन्यांमधील भारतीय संघाचा हा दुसरा विजय आहे आणि उद्या इंग्लंडने अखेरच्या साखळी सामन्यात जर ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर अंतिम फेरीत 12 फेब्रुवारी रोजी भारत-इंग्लंड आमने-सामने येतील.