Women's Team India Coach: विश्वचषक एक्झिटसोबत प्रशिक्षक रमेश पोवार पण ‘आऊट’, NCA प्रमुख आणि माजी दिग्गज क्रिकेटपटूला BCCI देणार मोठी जबाबदारी
Ramesh Powar | (Photo Credits-ANI/ Twitter)

Women's Team India Coach: न्यूझीलंड येथे सुरु असलेल्या आयसीसी महिला वनडे विश्वचषक (Women's ODI World Cup) स्पर्धेतून भारत महिला संघ (India Women's Team) बाहेर पडल्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार (Ramesh Powar) यांचा कार्यकाळ देखील संपुष्टात आला आहे. शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या धक्कादायक पराभवानंतर भारताचे सेमीफायनल गाठण्याचे स्वप्न भंगले. आणि पोवार यांना बीसीसीआयच्या  (BCCI) नियमांनुसार या पदासाठी पुन्हा अर्ज करावा लागेल. एक निराशाजनक विश्वचषक मोहीम महिला क्रिकेटमध्ये मोठे बदल घडवून आणू शकते, कारण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (National Cricket Academy) प्रमुख आणि पुरुष संघाचे दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) देशाच्या पुढील पिढीच्या क्रिकेटपटूंना तयार करण्यात सक्रियपणे सहभागी होत आहेत.

भारताच्या माजी ऑफस्पिनरने अनेकांना आश्चर्यचकित करून 2020 टी-20 विश्वचषक फायनलमध्ये संघाचे मार्गदर्शन केलेल्या WV रमन यांच्याकडून मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला. पीटीआयच्या अहवालात बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या अटीवर म्हटले, “पोवार यांचा करार विश्वचषकपर्यंत होता. मुदतवाढीची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अर्ज आणि मुलाखतींनी सुरू होते. पोवार नक्कीच पुन्हा अर्ज करू शकतात आणि घटनेनुसार CAC (क्रिकेट सल्लागार समिती) निर्णय घेईल.” भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून 43 वर्षीय माजी खेळाडूची दुसरी खेळी होती. यापूर्वी 2018 महिला टी-20 विश्वचषकदरम्यान ते वरिष्ठ फलंदाज मिताली राज हिच्यासोबत वादात अडकल्याने त्याची पहिली टर्म एका मोठ्या वादात अडकली होती.

दुसरीकडे, विश्वचषकात टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर NCA प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण महिला क्रिकेटमध्ये मोठी भूमिका बजावतील, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक पुढील वर्षी होणार आहे. आणि लक्ष्मणला महिला क्रिकेटमध्ये अधिक सहभागी होण्यासाठी हा एक प्रारंभिक पॉईंट म्हणून पाहिले जात आहे. तसेच माजी NCA प्रमुख राहुल द्रविड यांचाही याबाबत सल्ला घेतला जाण्याची शक्यता आहे.