Mitchell Starc- Andres Russl Faceoff: वेस्ट इंडिज (West Indies) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना आज पार पडला. मालिकेच्या चौथ्या सामन्यात कांगारू संघाने 4 धावांनी मात करून दौऱ्यावर पहिला विजय नोंदवला. या रोमांचक सामन्यात एक वेळ अशी आली होती की ऑस्ट्रेलियाचा पराभव होईल असे दिसत होते, पण त्यानंतर त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) डावातील अखेरच्या ओव्हरमध्ये अशी गोलंदाजी केली की ज्याने संपूर्ण सामनाच पालटला आणि सध्या सर्वत्र स्टार्कचे कौतुक होत आहे. स्टार्कने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील शेवटच्या षटकांपैकी सर्वात रोचक ओव्हर फेकली. शेवटच्या तीन ओव्हरमध्ये विंडीजला विजयासाठी 47 धावांची गरज होती. आंद्रे रसेल (Andre Russell) आणि फॅबियन अॅलन (Fabian Allen) यांनी गियर बदलला आणि आक्रमक फलंदाजी सुरू केली. (WI vs AUS 4th T20I: मिचेल मार्श याचा ऑलराउंडर शो, वेस्ट इंडिजवर 4 धावांनी मात करून मालिकेत ऑस्ट्रेलियाने मिळवला पहिला विजय)
रसेलने 18 व्या षटकातील चौथ्या आणि पाचव्या चेंडूंवर सलग चौकार ठोकले. या ओव्हरमध्ये दोन्ही फलंदाजांनी एकूण 11 धावा लुटल्या. आता शेवटच्या दोन षटकांत 36 धावांची आवश्यकता होती. रिले मेरेडिथच्या षटकांच्या पहिल्याच चेंडूवर रसेलने षटकार ठोकला.पुढील चेंडूवर एक धाव मिळाली. फॅबियन अॅलनने एक जबरदस्त खेळ दर्शवला आणि मेरेडिथच्या षटकांच्या सलग तीन चेंडूंवर षटकार ठोकले. पण, शेवटच्या बॉलवर तो झेलबाद होऊन माघारी परतला. शेवटच्या षटकात आंद्रे रसेलला 11 धावा करायच्या होत्या आणि त्याच्यासारख्या फलंदाजासाठी हे कठीण नव्हते. कॅरेबियन संघ सहज विजय मिळवेल असे दिसत होते. कांगारू संघाचा कर्णधार आरोन फिंचने संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला चेंडू सोपवला. स्टार्कने कमाल दाखवली आणि रसेलला मुक्तपणे खेळू दिले नाही. त्याने टी-20 करियरच्या सर्वोत्तम षटकांपैकी एक गोलंदाजी केली. स्टार्कने सलग चार डॉट बॉल टाकले आणि शेवटच्या दोन चेंडूंमध्येही अवघ्या सहा धावा दिल्या आणि संघाला चार धावांनी विजय मिळवून दिला.
Brilliant Final Over By Starc 🔥 pic.twitter.com/yS3Wy1eMOE
— 👑 (@UsthaddVirat) July 15, 2021
दुसरीकडे, या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने टॉस जिंकून मिचेल मार्शच्या 75 धावा, फिंचच्या 53 आणि डॅन ख्रिस्चनच्या नाबाद 22 धावांच्या जोरावर 189 धावांपर्यंत मजल मारली. फिन व मार्शमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 114 धावांची शतकी भागीदारी झाली. प्रत्युत्तरात विंडीज संघ 190 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात 185 धावाच करू शकला. उल्लेखनीय म्हणजे पहिले तीन सामने जिंकून वेस्ट इंडिजने मालिका खिशात घातली आहे.