वेस्ट इंडिजचा इंग्लंड दौरा (Photo Credit: Getty)

वेस्ट इंडिजचा (West Indies) क्रिकेट संघ सोमवारी अँटिगा येथून इंग्लंडच्या (England) तीन कसोटी सामन्यांसाठी रवाना झाला आहे. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे तब्बल दोन-तीन महिन्यापासून ठप्प झालेल्या क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरु होणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जुलै महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं असून त्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ मंगळवारी (आज) इंग्लंडमध्ये दाखल होणार असल्याचे वृत्त एएफपीने दिले. इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी विंडीज खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली, जी नकारात्मक आल्याने आता विंडीजच्या सर्व खेळाडूंचा दौऱ्यासाठी मार्ग मोकळा झाला. आदल्या दिवशी ते चार्टर विमानाद्वारे इंग्लंडसाठी रवाना झाले. वेस्ट इंडीज क्रिकेटने सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मॅनचेस्टरमध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे आगमन झाल्यानंतर संपूर्ण टीमची पुन्हा एकदा कोरोना टेस्ट करण्यात येईल आणि 14 दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाईल.

वेस्ट इंडिजचा नियोजित इंग्लंड दौरा हा जून महिन्यात होता. पण करोनाच्या तडाख्यामुळे या वेळापत्रकात बदल करण्यात आला. त्यानुसार आता ८ जुलैपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. सर्व सामने रिक्त स्टेडियममध्ये खेळले जातील. विंडीज खेळाडू जैव-सुरक्षित वातावरणात राहणार असून तीन आठवडे सराव करतील. विंडीज क्रिकेट मंडळाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून संघ इंग्लंडसाठी रवाना होत असल्याचा एक छोटा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे.

इंग्लंड दारुयासाठी वेस्ट इंडिजच्या 15 खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. पण, डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेटमायर आणि किमो पॉल असे 3 खेळाडूंनी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा हवाला देत दौऱ्यावर जाण्यास नकार दिला होता.

पाहा वेस्ट इंडिजचा संघ: जेसन होल्डर, क्रेग ब्रेथवेट, शाई होप, शेन डॉरिच, रोस्टन चेस, शेमार ब्रूक्स, रहकीम कॉर्नवॉल, एन्कुरमा बोनेर, अल्झारी जोसेफ, चेमार होल्डर, जॉन कँपबेल, रेमॉन रेफर, केमार रोच, जेर्मिन ब्लॅकवूड, शेनॉन गॅब्रिअल