Virat Kohli (Photo Credit - Twitter)

IND vs AFG 3rd T20: सध्या भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील दोन सामने जिंकून भारतीय संघाने 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना 17 फेब्रुवारीला बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यात चाहत्यांच्या नजरा पुन्हा एकदा टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीवर (Virat Kohli) खिळल्या आहेत. या सामन्यात विराट कोहली टी-20 क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी करू शकतो. ही कामगिरी करण्यासाठी विराट कोहली अवघ्या 6 धावांनी मागे आहे. (हे देखील वाचा: IND vs AFG 3rd T20 Live Streaming: टी-20 विश्वचषकापूर्वी भारताचा शेवटचा T20 सामना, कर्णधार रोहित शर्मा आज कोणते पर्याय आजमावणार? जाणून घेण्यासाठी येथे पाहा सामना)

टी-20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा पूर्ण करणार

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 क्रिकेटमध्ये विराट कोहली 14 महिन्यांनंतर टीम इंडियात परतला आहे. या मालिकेतील पहिला सामना विराट कोहली खेळू शकला नव्हता. त्यानंतर विराट कोहली इंदूरच्या मैदानावर दुसऱ्या सामन्यात खेळताना दिसला. या सामन्यात विराट कोहलीने 29 धावांची खेळी केली. आता या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात विराट कोहली आपल्या नावावर एक खास विक्रम नोंदवू शकतो. तिसऱ्या टी-20 सामन्यात विराट कोहलीने 6 धावा केल्या तर तो टी-20 क्रिकेटमध्ये 12000 धावा करणारा पहिला भारतीय आणि जगातील चौथा फलंदाज ठरेल. टी-20 क्रिकेटमध्ये अद्याप कोणत्याही भारतीय खेळाडूला ही कामगिरी करता आलेली नाही. सध्या विराटच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 41.35 च्या सरासरीने आणि 133.44 च्या स्ट्राईक रेटने 11994 धावा आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीने 91 अर्धशतके आणि 8 शतके झळकावली आहेत.

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

1. ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) – 14,562 धावा

2. शोएब मलिक (पाकिस्तान) – 12,993 धावा

3. किरॉन पोलार्ड (वेस्ट इंडिज) – 12,430 धावा

4. विराट कोहली (भारत) – 11994 धावा

आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा

विराट कोहली हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज आहे. विराट कोहलीच्या नावावर 115 टी-20 सामन्यांच्या 107 डावांमध्ये 4008 धावा आहेत. या काळात त्याने आपल्या बॅटने एक शतक आणि 37 अर्धशतके झळकावली आहेत. या यादीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. रोहितच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3853 धावा आहेत.