आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) शनिवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पुन्हा एकदा शानदार फलंदाजी केली. मोसमातील चौथ्या सामन्यात त्याने तिसरे अर्धशतक ठोकले. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 34 चेंडूत 50 धावांची खेळी केली आणि एक जबरदस्त विक्रम आपल्या नावावर केला. विराटच्या आयपीएल कारकिर्दीतील हे 47 वे अर्धशतक आणि 52 वे फिफ्टी किंवा फिफ्टी प्लसचा स्कोअर होता. या प्रकरणात, रन मशीनने आता भारताचा दुसरा स्टार क्रिकेटर शिखर धवनला मागे टाकले आहे. विराट कोहलीनेही आयपीएलमध्ये पाच शतके झळकावली आहेत.
विराट कोहलीची चांगली कामगिरी
विराट कोहलाने या मोसमात कमालीची कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मोसमातील पहिल्या सामन्यात त्याने 49 चेंडूत 82 धावांची शानदार खेळी केली. यानंतर तो केकेआरविरुद्ध केवळ 21 धावा करू शकला, पण त्याने लखनऊविरुद्ध 61 आणि आता दिल्लीविरुद्ध 50 धावा खेळून आश्चर्यकारक कामगिरी केली. या मोसमात त्याचे तिसरे अर्धशतक होते आणि त्याने आतापर्यंत 4 डावात 147.59 च्या स्ट्राइक रेटने 214 धावा केल्या आहेत. (हे देखील वाचा: RCB vs DC, IPL 2023 Match: बंगळुरूचा दिल्लीवर 23 धावांनी विजय, कोहलीच्या पाठोपाठ गोलंदाजांनी केले चमत्कार)
आयपीएलमधील सर्वोच्च 50 प्लस स्कोअर
डेव्हिड वॉर्नर - 62 (58 अर्धशतक, 4 शतके)
विराट कोहली - 52 (47 अर्धशतक, 5 शतके)
शिखर धवन - 51 (49 अर्धशतक, 2 शतके)
एबी डिव्हिलियर्स - 43 (40 अर्धशतक, 3 शतके)
रोहित शर्मा - 42 (41 अर्धशतक, 1 शतक)
विराटची बॅट जोरदार बोलू लागली
विराट कोहलीचा शेवटचा आयपीएल हंगाम काही खास नव्हता. गेली दोन वर्षे त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट वर्षांपैकी एक होती. पण आता त्याची बॅट बोलू लागली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर आता आयपीएलमध्येही विराटची बॅट जोरदार बोलू लागली आहे. सध्याच्या मोसमात, तो आरसीबीसाठी सलामीवीर म्हणून उतरत आहे आणि कर्णधार फाफ डू प्लेसिससह तो संघाला सातत्याने चांगली सुरुवात करत आहे. टी-20, कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये शतके झळकावल्यानंतर विराट आयपीएलमध्येही ही कामगिरी करू शकेल की नाही, हे पाहणे बाकी आहे.