पृथ्वी शॉ (Photo Credits: Twitter)

Vijay Hazare Trophy Final 2021: विकेटकीपर-फलंदाज आदित्य तरे (Aditya Tare) आणि कर्णधार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांच्या सर्वोत्तम खेळीच्या जोरावर रविवारी अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy) अंतिम सामन्यात मुंबईने उत्तर प्रदेशला 6 विकेटने धूळ चारली आणि चौथ्यांदा स्पर्धेचे जेतेपद पटकावले. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना माधव कौशिकच्या (Madhav Kaushik) 156 चेंडूत 15 चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद 158 धावांच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये चार विकेट गमावून 312 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात, मुंबई (Mumbai) टीमने तरेच्या 107 चेंडूत 18 चौकारांच्या मदतीने नाबाद 118 आणि पृथ्वीच्या 39 चेंडूत 10 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 73 धावांच्या जोरावर 41.3 ओव्हरमध्ये चार विकेट गमावून 315 धावा करत सामान्यासह विजेतेपद पटकावले. (Vijay Hazare Trophy Final 2021: विजय हजारे ट्रॉफीत Prithvi Shaw याची धूम, धमाकेदार फलंदाजी करत रचला इतिहास, UP च्या माधव कौशिकने ही मोडले अनेक रेकॉर्ड)

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुंबईकडून पृथ्वी आणि यशस्वी जयस्वालच्या जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली. यादरम्यान संघाचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरच्या जागी संघाचे नेतृत्व करणारा पृथ्वी एका हंगामात 800 हून अधिक धावा करणारा पहिला खेळाडू ठरला. पृथ्वी आणि यशवी बाद झाल्यानंतर तरेने शम्स मुलानीसह तिसर्‍या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. मुंबईच्या डावात तरे आणि पृथ्वीला वगळता शिवम दुबेने 42, शम्स मुलानीने 36 आणि यशस्वीने 29 धावांचे योगदान दिले. सरफराज खान तीन धावा करून नाबाद परतला. उत्तर प्रदेशकडून यश दयाल, शिवम मावी, शिवम शर्मा आणि समीर चौधरी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

तत्पूर्वी, उत्तर प्रदेशने चांगली सुरुवात केली आणि कौशिक व समर्थ सिंहने पहिल्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली. कौशिकशिवाय समर्थने 73 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकार खेचत 55 धावा तर अक्षदीप नाथने 40 चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. प्रियांम गर्गने दोन चौकारांच्या मदतीने 26 चेंडूत 21 धावांचे योगदान दिले. उपेंद्र यादव 9 धावा करून नाबाद परतला. मुंबईकडून तनुष कोटियाने दोन आणि प्रशांत सोलंकीने एक गडी बाद केला.