पृथ्वी शॉ आणि माधव कौशिक (Photo Credit: Twitter)

Vijay Hazare Trophy Final 2021: मुंबई (Mumbai) आणि उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) संघातील विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy) फायनल सामन्यात मुंबईचा कर्णधार आणि ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने इतिहास रचला. पृथ्वी विजय हजारे ट्रॉफीच्या एका आवृत्तीत 800 किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यातील विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शॉने ही कामगिरी केली. अंतिम सामन्यात 313 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने 39 चेंडूत 10 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 79 धावा ठोकल्या. पृथ्वीने सध्याच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये दुहेरी शतक, तीन शतके आणि अर्धशतकांच्या मदतीने 8 सामन्यांत एकूण 827 धावा केल्या आहेत. गुरुवारी विजय हजारे ट्रॉफीच्या आवृत्तीत 21 वर्षीय पृथ्वीने मयंक अग्रवालचा एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला होता. मयंकने 2017-18 आवृत्तीत एकूण 723 धावा केल्या होत्या. (IPL 2021: ‘या’ 5 आयपीएल स्टार खेळाडूंनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये केली कमाल, आता टी-20 लीगमध्ये करणार धमाल)

इतकंच नाही तर, पृथ्वीने सध्याच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये एकूण चार शतके ठोकली असून भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. 2008-09 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये कोहलीने चार शतके ठोकली होती. पृथ्वीने मंगळवारी सौराष्ट्र संघाविरुद्ध 123 चेंडूंत 185 धावांची केली होती आणि लिस्ट A क्रिकेटमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना महेंद्र सिंह धोनी आणि विराटने केलेल्या सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रमही मोडला. 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध धोनीने 183 धावा केल्या होत्या तर 2012 ढाका येथे झालेल्या आशिया चषक स्पर्धेत कोहलीने पाकिस्तानविरुद्ध 183 धावांची खेळी केली होती. दुसरीकडे, उत्तर प्रदेश संघाचा ओपनर माधव कौशिकनेही (Madhav Kaushik) अनेक विक्रम मोडले. माधव विजय हजारे ट्रॉफी फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. माधवने मुंबईविरुद्ध 158  धावा ठोकल्या आणि मयंक अग्रवालचा फायनलमध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड मोडला. मयंकने 2014 मध्ये अंतिम सामन्यात 125 धावा केल्या होत्या.

मुंबई आणि उत्तर प्रदेश संघातील अंतिम सामन्यात पहिले फलंदाजी करणाऱ्या उत्तर प्रदेशने 4 विकेट गमावून 312 धावांपर्यंत मजल मारली. विशेष म्हणजे, कौशिक स्पर्धेच्या फायनलमध्ये 150 धावांची खेळी करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. शिवाय, माधवने पहिल्या 23 चेंडूंवर एकही धाव काढली नाही आणि 24व्या बॉलवर एक धाव घेत आपलं खातं उघडलं. माधवने आपल्या खेळी 15 चौकार आणि 4 षटकार लगावले.