Umar Gul Announces Retirement: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज उमर गुलने (Umar Gul) शनिवारी राष्ट्रीय टी -20 कप स्पर्धा संपल्यानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. गुलने 2016मध्ये पाकिस्तानसाठी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. राष्ट्रीय टी-20 कप स्पर्धेत त्याने बलुचिस्तानचे (Baluchistan) प्रतिनिधित्व केले. शुक्रवारी रावळपिंडी (Rawalpindi) येथे दक्षिण पंजाबकडून पराभूत झाल्यानंतर त्यांची टीम उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडली. गुलने ट्विटरवर पोस्ट शेअर करून सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचं जाहीर केलं. गुलने आपल्या ट्विटर पेजवर लिहिले की, "खूप मनापासून आणि बरेच विचार करून मी राष्ट्रीय टी-20 कपनंतर क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे." तो पुढे म्हणाला, "मी नेहमीच पाकिस्तानसाठी पूर्ण उत्कटतेने खेळलो. क्रिकेट हे नेहमीच माझे पहिले प्रेम असेल. पण सर्व चांगल्या गोष्टींचा एक दिवस संपुष्टात येतात." 17 वर्षांच्या समृद्ध कारकिर्दीनंतर गुलने निवृत्ती जाहीर केली.
पेशावरमध्ये जन्मलेल्या 36 वर्षीय गुलने 2003 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी त्याने आपला पहिला कसोटी सामना खेळला. गुलने 47 कसोटी सामन्यात 34.06 च्या सरासरीने 163 गडी बाद केले, तर 130 वनडे सामन्यात 179 विकेट आणि 60 आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 85 विकेट मिळवले आहेत. गुलने खेळाच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आणि 2009 च्या टी-20 वर्ल्ड कप विजयात संघातील नायकांपैकी एक होता. तो राष्ट्रीय संघात सर्वात सुसंगत कामगिरी करणारा खेळाडू होता आणि एप्रिल 2003 मध्ये झिम्बाब्वेविरुद्धवनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
With a very heavy heart and after a lot of thinking, i have decided to bid farewell to all formats of cricket after this National T20 Cup. I have always played for Pakistan with all my heart and 100% of hardwork. Cricket is and will always be my love n passion 1/3
— Umar Gul (@mdk_gul) October 16, 2020
टी -20 क्रिकेटमध्ये यॉर्करमुळे, गुल एक विशेष गोलंदाज म्हणून उदयास आला. गुलने 60 सामने खेळताना 85 विकेट घेतल्या आणि टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या पहिल्या पाच गोलंदाजांपैकी गुल एक आहे. मात्र 2015 एकदिवसीय विश्वचषकानंतर गुलला या स्वरुपात खेळण्याची संधी मिळाली नाही. गुलने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2016 मध्ये खेळला असून त्यानंतर तो फक्त घरगुती क्रिकेट खेळत आहे.