Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू हिचे इम्फाल विमानतळावर भव्य स्वागत, मुख्यमंत्री स्वत: स्वागतासाठी विमानतळावर हजर (Watch Video)
मीराबाई चानू (Photo Credit: Twitter)

Tokyo Olympics 2020: सोमवारी क्रीडा मंत्रालयाच्या वतीने सत्कार झाल्यानंतर इम्फाल विमानतळावर (Imphal Airport) टोकियो येथे आयोजित ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेत स्टार भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू (Mirabai Chanu) यांचे भव्य स्वागत झाले. तेथे हजारो हितचिंतक आपल्या स्थानिक नायकाचे स्वागत करण्यासाठी एकत्र जमले होते. इतकंच नाही तर मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बीरेन सिंग (N Biren Singh) वर चानू हिच्या स्वागतासाठी पोहचले होते. ऑलिम्पिक (Olympics) स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करणारी चानू भारताची पहिली वेटलिफ्टर ठरली आहे. विमानतळावर कुटुंबातील इतर सदस्यांसह तिला घेण्यासाठी आईने मिठी मारल्यावर चानूचे डोळे पाणावले. चानूच्या विजयानंतर मणिपूर सरकारने युवा वेटलिफ्टरला 1 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते. (Tokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव)

बीरेन सिंग यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर चानूच्या आगमनाचा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “मीराबाई चानू घरी आपले स्वागत आहे. राज्यातील प्रत्येकजण तुम्हाला मणिपूर येथे परतलेले पाहून अत्यंत आनंदित आहे. टोकियो 2020 मधील तुमची कामगिरी काही खास आहे आणि आम्हाला तुमचा अभिमान आहे.” दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीनंतर मिराबाईची अतिरिक्त पोलीस अधीक्षक (क्रीडा) या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी याविषयी अधिकृतरीत्या घोषणा करत चानूचे कौतुकही केले. मणिपूरच्या 26 वर्षीय चानूने शनिवारी महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्यपदकावर नाव कोरून भारताचे यंदाच्या ऑलिम्पिकमधील पदकांचे खाते उघडले.

भारतात पोहोचल्यानंतर वृत्तसंस्था ANI शी बोलताना चानू म्हणाली की “ते बरेच आव्हानात्मक होते. आम्ही 2016 मध्ये तयारी सुरू केली आणि रिओ ऑलिम्पिकनंतर प्रशिक्षण पद्धती बदलल्या. आम्ही (चानू आणि त्याचे प्रशिक्षक) पाच वर्षांचे बलिदान देऊन टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी खूप परिश्रम घेतले. आपले स्वप्न सत्यात उतरले आहे.” स्पर्धेतील तिच्या चार यशस्वी प्रयत्नांमध्ये चानूने एकूण 202 किलो (स्नॅचमध्ये 87 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो) वजन उचलले.