रिकी पॉन्टिंग (Photo Credits: IANS)

ऑस्ट्रेलियन मीडिया 'चॅनल 7' ने एक धक्कादायक बातमी दिली आहे. ऑस्ट्रेलियाचे (Australia) माजी वर्ल्ड कप कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) यांचे मेलबर्नमधील (Melborune) घरात गेल्या आठवड्यात चोरांनी दरोडा घातला. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या ड्राईव्हवेमध्ये उभी असलेली माजी क्रिकेटपटूची गाडी चोरी केल्याची माहिती मिळाली आहे. चोरटे घरात घुसले तेव्हा पॉन्टिंग, त्याची बायको आणि तीन मुलं मेलबर्नच्या किनाऱ्यालगत फिरायला गेली होती. ही घटना शुक्रवारी घडली. पॉन्टिंगच्या घरात ठेवलेली गाडी घेऊन चोरटे पसार झाले त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर, गाडी परत मिळवण्यासाठी पोलिसांना खूप संघर्ष करावा लागला. कारचा शोध घेण्यासाठी स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप आणि एअरविंग तैनात करण्यात आले होते आणि शनिवारी अखेर पोलिसांना गाडी मेलबर्नच्या केम्बरवेल भागात सापडली. मात्र, गाडी चोरणारे दोन जण पोलिसांपासून पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिस अद्यापही संशयितांचा शोध घेत आहेत. (IND vs ENG 1st Test 2021: सुनील गावस्कर, रिकी पॉन्टिंग यांचा विक्रम धोक्यात, टीम इंडिया कर्णधार विराट कोहली करतोय पाठलाग)

पॉन्टिंग ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार तसेच सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. पॉन्टिंगने 168 कसोटी सामन्यांमध्ये 51.85 च्या सरासरीने 13,378 धावा केल्या आहेत.त्याने 375 एकदिवसीय सामन्यांमध्येही तुफान कामगिरी करत 42 च्या सरासरीने 13704 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर यांच्यानंतर पॉन्टिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकवीर आहे. पॉन्टिंगने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 71 शतकं केली असून इंग्लंडविरुद्ध भारतात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत एक शतक करताच भारतीय कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियन दिग्गजाची बरोबरी करेल. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजवर 70 शतक केले आहेत. पाँटिंगने कसोटीत 41 शतके आणि वनडेमध्ये 30 शतके ठोकली आहेत. इतकंच नाही तर पॉन्टिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया सर्वाधिक 2 वर्ल्ड कप (2003 आणि 2007) जिंकले आहेत तर, 2006 आणि 2009 मध्ये त्याच्या नेतृत्वात कांगारू संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचे मानकरी ठरले.

दुसरीकडे, 100व्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतकी खेळी करणारा पॉन्टिंग एकमात्र क्रिकेटर आहे. पॉन्टिंगने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात 120 आणि दुसरी डावात 143 धावांसह सामन्यात 263 धावा केल्या होत्या.