विराट कोहली आणि सुनील गावस्कर (Photo Credit: PTI, Facebook)

IND vs ENG 1st Test 2021: टीम इंडिया (Team India) कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) आता पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष लागून असणार आहे. पितृत्व रजेच्या तब्बल दीड महिन्यानंतर विराट मैदानावर फलंदाज आणि कर्णधार म्हणून कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. 87 सामन्यात 27 शतक करणाऱ्या कोहलीला मागील 13 महिन्यात एकही शतक ठोकता आले नाही. अ‍ॅडिलेड कसोटीत तो शतकी धावसंख्येचा जवळ पोहचला होता मात्र 74 धावांवर माघारी परतला. त्यामुळे, इंग्लंडविरुद्ध (England) आगामी मालिकेत तो आणखी मोठी खेळी करण्यासाठी उत्सुक असेल आणि इंग्लिश टीमविरुद्ध कोहलीचा मागील रेकॉर्ड पाहता चाहत्यांना रन-फेस्ट पाहायाला मिळेल असे दिसत आहे. इंग्लंडविरुद्ध विराटच्या रडारवर माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) आणि माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) यांच्या वर्ल्ड रेकॉर्डवर असेल. (IND vs ENG Test Series 2021: विराट कोहलीच्या रडारवर MS Dhoni याचे 3 मोठे रेकॉर्ड, इंग्लंडविरुद्ध टेस्ट सिरीजमध्ये करावे लागणार 'हे' काम)

कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर सुनील गावस्करने केलेल्या सर्वाधिक धावांना मागे टाकण्यासाठी कोहलीला 489 धावांची गरज आहे. कोहलीने 9 सामन्यात 843 धावा केल्या असून सचिन तेंडुलकर आणि गुंडप्पा विश्वनाथ यांना मागे टाकण्याची संधी आहे. चेतेश्वर पुजाराही 839 धावांसह गावस्कर यांचा विक्रम मोडण्याच्या पथावर आहे. कसोटीत इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर भारतीय फलंदाजाने सर्वाधिक शतकांचा विक्रम पुजाराच्या नावावर आहे. पुजाराने इंग्लिश संघाविरुद्ध भारतात 4 टेस्ट शतक केले आहेत. दरम्यान, घरच्या कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडण्याचाही विराट प्रयत्नशील असेल. पॉन्टिंगने कर्णधार म्हणून 11 शतके आणि 3,555 धावा करून कारकीर्द संपविली होती तर कर्णधार म्हणून कोहलीने होम टेस्टमध्ये 10 शतके 2.699 धावा केल्या आहेत.

शिवाय, पहिल्या सामन्यात शतक करताच विराट पॉन्टिंगची बरोबरी करत विराटकडे ऑस्ट्रेलियन कर्णधाराला मागे टाकण्याची संधी आहे. विराट-पॉन्टिंगने कर्णधार म्हणून सर्वाधिक 41 शतक केलेले असून इंग्लंडविरुद्ध एक शतक करताच कोहली कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकांचा विश्वविक्रम नोंदवेल. दुसरीकडे, इंग्लंडविरुद्ध शतक कोहलीच्या आंतरराष्ट्रीय करिअरमधील 71वे शतक ठरेल. माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॉन्टिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसरे सर्वाधिक 71 शतकं केलेली आहे. जर विराटला यंदाच्या कसोटी मालिकेत शतकी खेळी करण्यात यश मिळाले तर याबाबतीत पॉन्टिंगची बरोबरी करेल.