Team India (Photo Credit - X)

कोलंबो: श्रीलंकेने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 110 धावांनी पराभव केला (India Beat Sri Lanka) आहे. श्रीलंकेने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. 1997 नंतर प्रथमच श्रीलंकेने भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs SL 3rd ODI) श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत सात गडी गमावून 248 धावा केल्या, प्रत्युत्तरात भारतीय संघ 26.1 षटकांत केवळ 138 धावाच करू शकला. भारताकडून सर्वाधिक रोहित शर्माने 35 धावा केल्या. तर श्रीलंकेकडून दुनिथ वेललागेने 5 विकेट घेतल्या. या संपूर्ण मालिकेत श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजीसमोर भारताचे दिग्गज फलंदाज पुर्णपणे अपयशी ठरले. या मालिकेत टीम इंडियाच्या पराभवासाठी कोणते खेळाडू जबाबदार ठरले ते आम्ही तुम्हाला सांगू.

रोहित शर्मा

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या बॅटने या मालिकेत काम केले पण तो लांब डाव खेळण्यात अपयशी ठरला. रोहित शर्माने 3 वनडे सामन्यात एकूण 157 धावा केल्या. या मालिकेत त्याने 2 अर्धशतके झळकावली आणि त्याचा स्ट्राईक रेटही 134.07 होता. तिन्ही सामन्यांमध्ये सेट झाल्यानंतर रोहित शर्माने आपली विकेट गमावली. मात्र, सेट झाल्यानंतर तो मैदानावर राहिला असता, तर तो दीर्घ खेळी खेळून टीम इंडियासाठी सामना जिंकू शकला असता.

विराट कोहली

विराट कोहली हा भारताचा वरिष्ठ खेळाडू आहे. त्याच्याकडून कोणत्याही सामन्यात चांगली कामगिरी अपेक्षित आहे. मात्र या मालिकेत विराट कोहलीही फ्लॉप ठरल्याचे दिसून आले. विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यात 58 धावा केल्या होत्या. त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 24 होती. विराट कोहलीची ही खराब कामगिरी टीम इंडियाच्या पराभवाचे कारण ठरली. (हे देखील वाचा: IND vs SL 3rd ODI: मोहम्मद सिराज आणि कुसल मेंडिस मैदानावर भिडले, जोरदार झाली वादावादी; पाहा व्हिडिओ)

श्रेयस अय्यर

या मालिकेत बऱ्याच कालावधीनंतर श्रेयस अय्यरची टीम इंडियात निवड झाली. आपल्या कामगिरीने तो आपली निवड योग्य सिद्ध करेल, अशी अपेक्षा होती. मात्र या मालिकेत श्रेयस अय्यरही वाईटरित्या फ्लॉप झाला. श्रेयस अय्यरने 3 सामन्यात 38 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेटही 100 पेक्षा कमी होता.

केएल राहुल

टीम इंडियाने पहिल्या 2 सामन्यात केएल राहुलला संधी दिली होती. केएल राहुललाही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. त्याने 2 सामन्यात केवळ 31 धावा केल्या. त्याची खराब कामगिरी पाहून तिसऱ्या सामन्यात ऋषभ पंतचा संघात समावेश करण्यात आला मात्र ऋषभ पंतलाही विशेष कौशल्य दाखवता आले नाही. ऋषभ पंत अवघ्या 6 धावा करून बाद झाला.

शिवम दुबे

भारतीय संघाने पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये शिवम दुबेलाही संधी दिली होती. या दोन्ही सामन्यात शिवम दुबेची बॅटही शांत राहिली. शिवमने 2 सामन्यात केवळ 25 धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात त्याच्या जागी रियान परागला प्लेइंग-11 मध्ये स्थान देण्यात आले. रियान परागने 3 विकेट घेण्यासोबतच 15 धावा केल्या.