आज, रविवारी दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन (DDCA) च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (Annual General Body Meeting) भारतीय क्रिकेट विश्वातील लाजीरवाणी घटना घडली. या बैठकीत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले आणि त्यानंतर परिस्थिती इतकी बिघडली की, हे प्रकरण अक्षरशः हाणामारीपर्यंत गेले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, यामुळे डीडीसीएवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पत्रकार बोरिया मजूमदार यांनी सोशल मीडियावर बीसीसीआय, सौरव गांगुली आणि जय शाह यांना टॅग करत, या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.
पहा व्हिडीओ -
This is also Indian cricket. Hooligans running our game. Each of these people are a disgrace. @BCCI @SGanguly99 @JayShah This is the AGM of DDCA. I don’t know if there can be any worse. Need action against these people with immediate effect. pic.twitter.com/qKONsPUW4N
— Boria Majumdar (@BoriaMajumdar) December 29, 2019
अरुण जेटली स्टेडियम, फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या या बैठकीत व्यासपीठावरील अधिकाऱ्यांनी एकमेकांवर आरोप केले, ज्याची परिणीती भांडणात झाली. याबाबत मजूमदार यांनी म्हटले आहे, 'घडलेला हा प्रकार खेळाचा अपमान आहे, अशा लोकांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे.' बैठकीत अजेंडाच्या मुद्दय़ावर सहमती झाली नाही तरी, अजेंडा पास करण्यासाठी भांडण सुरु झाले. या व्हिडिओमध्ये सहसचिव राजन मनचंदा हे समितीच्या इतर सदस्यांशी भांडताना दिसत आहेत. माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मदनलाल यांनी बीसीसीआय आणि बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना या संदर्भात कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. (हेही वाचा: भारतात क्रिकेट खेळणे असुरक्षित असल्याच्या PCB च्या बालिश विधानावर BCCI ने केला पलटवार, म्हणाले -'स्वत:च्या देशाचा विचार करा')
गेल्या महिन्यातच रजत शर्मा यांनी डीडीसीए अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर हे पद रिक्त झाले आहे. रजत शर्मा यांनी कोणत्याही किंमतीवर आपल्या ईमानदारी तडजोड करणार नाही, असे सांगून हे पद सोडले होते. यामुळे, डीडीसीएबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या. गेल्या वर्षी जुलैमध्ये रजत शर्मा यांनी माजी क्रिकेटपटू मदन लाल यांना, 517 मतांनी पराभूत करून हे पद प्राप्त केले होते. त्यांचा 20 महिन्यांचा कार्यकाळ चढउतारांनी भरलेला होता. याकाळात सरचिटणीस विनोद तिहाडा यांच्याशी असलेले त्यांचे मतभेददेखील लोकांसमोर आले होते.