India National Cricket Team (Photo Credits: Getty Images)

भारतीय क्रिकेट बोर्ड, बीसीसीआय (BCCI) आज टीम इंडियाच्या नवीन प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची घोषणा करणार आहे. विश्वचषकनंतर बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक, बॅटिंग- बॉलिंग आणि अन्य पदांसाठी नवीन अर्ज मागवले होते. याबाबत उत्सुकता दाखवत हजारो उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज पाठवले. त्यातून सहा नावांची निवड करण्यात आली आणि आता सध्या मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात मुलाखती सुरू झाल्या आहेत. आणि सर्वांचे लक्ष लागून आहे ते मुख्य प्रशिक्षक कोण होणार याच्यावर. कर्णधार विराट कोहली याने रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना पसंती दिली आहे. त्यामुळे या पदावर ते कायम राहतात की नवा चेहरा निवडला जातो, हे आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. पण, नवीन प्रशिक्षकाचा कार्यकाळ हा 2021 पर्यंतच असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. (टीम इंडियाला मिळणार नवीन कोच, आज संध्याकाळी BCCI करणार अधिकृत घोषणा)

न्यूज एजेन्सी IANS शी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. ''मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ 2021 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टी-20 स्पर्धेपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा मुख्य प्रशिक्षक निवडीची पुन्हा प्रक्रिया पार पडेल. यासह सपोर्ट स्टाफलाही वर्ल्ड टी-20 पर्यंतचा करार देण्यात येईल. त्यानंतर पुढील महत्त्वांच्या स्पर्धा लक्षात घेता, नव्याने मुलाखती होतील.''

ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू टॉम मूडी आणि न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे माजी प्रशिक्षक माइस हेसन यांच्याकडून रवी शास्त्री यांना टफ फाईट आहे. पण, शास्त्री यांना या पदावर कायम राहण्याचे वृत्त अनेकदा समोर आले. 2017 मध्ये अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.