भारत-दक्षिण आफ्रिका (Photo Credit: Getty)

यावर्षी इंडियन प्रीमिअर लीग (IPL) आयोजित करण्याचा मार्ग स्पष्ट मानला जात आहे. आयपीएलचे आयोजन यंदा युएईमध्ये (UAE) 26 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केले जाऊ शकते. आयपीएल गव्हर्निंग चेअरमन ब्रिजेश पटेल यांनीही युएईमध्ये लीगच्या आयोजनाची घोषणा केली आहे. तसेच बोर्ड सरकार मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, असेही ते म्हणाले. पण आयपीएलपूर्वी बीसीसीआय युएईमध्येच भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका घेण्याची चर्चा करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. InsideSportच्या अहवालानुसार क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने (CSA) या मालिकेचा प्रस्ताव पाठविला आहे. काही काळापूर्वी ऑगस्टमध्ये भारत तीन सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर जाईल अशा चर्चा सुरु होत्या, पण कोविड-19 मुळे प्रस्तावित मालिकेवरील चर्चा थांबली. (UAE येथे होणार होणार इंडियन प्रीमियर लीग 13, आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी केली पुष्टी; BCCI ने मागितली सरकारची मंजुरी)

भारत-दक्षिण आफ्रिका मालिका दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डासाठी आर्थिक तारणकर्ता म्हणून पहिली जात आहे ज्यांनी स्वत: कबूल केले होते की जर मालिका घेतली नाही तर ‘त्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागेल.’ ‘यूएईमध्ये आयपीएल 2020 पूर्वी 3 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनेआमच्याकडे संपर्क साधला आहे. सर्व प्रथम आयपीएलसाठी आमच्या योजना कशा तयार करता येतील यावर अवलंबून आहेत. मंजूरी, रसद, ऑपरेशन्ससह बर्‍याच गोष्टींची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आमच्यासाठी आयपीएल प्राथमिकता आहे. एकदा ते पूर्ण झाल्यावर आम्ही या मालिकेचा विचार करू शकतो, ते सध्या अकाली आहे,” InsideSportला बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिका टीम तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आली होती. धर्मशाळा येथील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, तर अन्य दोन सामने कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे रद्द करण्यात आले. मार्चच्या सुरूवातीला न्यूझीलंडचा दौऱ्यानंतर टीम इंडियाने कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. सध्या, आयसीसीने टी-20 विश्वचषक पुढे ढकलल्याने बीसीसीआयने आयपीएलची तयारी सुरू केली आहे. आयपीएलचे अध्यक्ष बृजेश पटेल यांनी यापूर्वी ही स्पर्धा युएईमध्ये होण्याची शक्यता असल्याची पुष्टी केली आहे.