वेस्ट इंडिज टेस्ट सिरीजसाठी भारतीय संघ जाहीर ; मयंक आणि सिराजला संधी
मोहम्मद सिराज व मयंक अग्रवाल (Photo Credits: IANS)

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. 4 ऑक्टोबरपासून कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यासाठी निवड समितीने खराब कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना डच्चू दिला आहे. त्यात शिखर धवन, मुरली विजय आणि इशांत शर्मा या खेळाडूंचा समावेश आहे. तर पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल या नवोदीत खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. ही मालिका दोन कसोटी सामन्यांची असून राजकोट आणि हैद्राबाद येथे हे सामने रंगणार आहेत.

देशातील क्रिकेट स्पर्धांमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या मयांक अग्रवालला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. तर इंग्लंड दौऱ्यात निराशाजनक कामिगरी करणाऱ्या शिखर धवनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. इंग्लंड दौऱ्यात आठ डावात संधी मिळूनही त्याने एकदाही अर्धशतक करण्यात अपयशी ठरला. करुण नायर, दिनेश कार्तिक या दोघांनाही डच्चू देण्यात आला आहे.

4 ऑक्टोबरपासून सुरुवात होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्याचा पहिला सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 12 ऑक्टोबरपासून हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु होईल. भारतीय संघाचे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेऊन निवड समितीने भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली आहे. त्याचबरोबर हार्दिक पांड्या, इंशात शर्मा यांनाही टीममध्ये स्थान मिळालेले नाही. या सिरीजमध्ये विराट कोहली कर्णधार असून अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधाराचे पद आहे.

असा आहे वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीचा भारतीय संघ

विराट कोहली , लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पूजारा, अजिंक्य रहाणे , ऋषभ पंत , हनुमा विहारी, आर. अश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर.