
शुक्रवारी UAE आणि ओमानमध्ये खेळल्या जात असलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) स्पर्धेत दोन सामने खेळले गेले. यातील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने (West Indies) बांगलादेशचा तीन धावांनी रोमहर्षक पराभव करून उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत, तर दुसऱ्या सामन्यात सामना या स्पर्धेत पाकिस्तानने (Pakistan) तिसरा विजय मिळवला आणि शेजारील देश अफगाणिस्तानचा (Afghanistan) पाच विकेट्सने पराभव केला. या स्पर्धेतील त्यांचा हा सलग तिसरा विजय असून त्यांचे सेमीफायनल फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. या विजयामुळे पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तानचे अव्वल स्थान भक्कम झाले आहे. या संघाचे सहा गुण असून ते गट 2 मध्ये अव्वल स्थानावर आहे. या दोन सामन्यांनंतर गुणतालिकेत (T20 World Cup Points Table) हालचाली झाल्या आहेत. मात्र दोन्ही सुपर-12 गटातील अव्वल स्थानावर कोणताही बदल झालेला नाही. या पराभवामुळे अफगाणिस्तानने गुणतालिकेत पहिले स्थान मिळवण्याची संधी गमावली आहे. (T20 World Cup, PAK vs AFG: अफगाणिस्तानविरुद्धचा सामना पाकिस्तानने घातला खिशात, आसिफ अलीने 4 षटकार ठोकत केली विजयाची हॅट्रीक)
टी-20 विश्वचषकच्या गट-1 बद्दल बोलायचे झाले तर इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी पहिले दोन सामने जिंकले आहेत. दोघांचे प्रत्येकी चार गुण आहेत, मात्र फक्त नेट रनरेटच्या आधारावर इंग्लंडने पहिले स्थान काबीज केले आहे. शुक्रवारप्रमाणेच टी-20 विश्वचषकात शनिवारी दोन महत्त्वाचे सामने होणार आहेत. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात रंगतदार लढत होणार आहे. शारजाह येथील हा सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. याशिवाय संध्याकाळी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा सामना होणार आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही त्यामुळे गटात पहिल्या पराभवाची चव कोणता संघ चाखतो याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.
गट-1 मधील पहिले दोन सामने गमावलेल्या वेस्ट इंडिज आणि बांगलादेशची ही टक्कर अत्यंत महत्त्वाची होती आणि पराभूत संघाचा प्रवास जवळपास निश्चित झाला होता. बांगलादेश त्याला बळी पडला. बांगलादेश सलग तिसऱ्या पराभवानंतर गुणतालिकेत तळाशी असून स्पर्धेतून जवळपास बाहेर पडला आहे. तसेच या विजयासह वेस्ट इंडिजचे दोन गुण झाले आहेत आणि ते श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेशी बरोबरीत आहेत, परंतु गतविजेता संघ नेट रनरेटमुळे पिछाडीवर आहे.