संग्रहीत प्रतिमा

क्रिकेट प्रेमी एशीया चषकाचा आनंद लुटत असताना संपूर्ण क्रिकेट विश्वालाच हादरवून टाकणारे एक वृत्त आले आहे. क्रिकेटमधील मॅच फिक्सींग प्रकरणाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, या प्रकरणात जवळपास आठ खेळाडूंचा समावेश असल्याचे समजते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अॅण्टी-करप्शन युनिटच्या एका अहवालात मॅच फिक्सींग प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकरणात काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि कर्णधार असल्याचाही संशय आहे.

आयसीसीच्या हवाल्याने एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या एका खास वृत्तात एकूण आठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मॅच फिक्सींग प्रकरणात अडकल्याची शक्यता वर्तवली आहे. या आठ क्रिकेटपटूंमध्ये पाच कर्णधारांसह इतर खेळाडू असल्याचा संशय आहे. एकूण अहवाल पाहता हे प्रकरण आयसीसीसाठी चांगलेच जड जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आयसीसीचे अँटी-करप्शन युनिटचे सिक्युरिटी युनिटचे जनरल मॅनेजर अॅलेक्स मार्शल यांनी या प्रकरणाबद्दल थेट बोलण्यास नकार दिला. मात्र, मॅच फिक्सींग प्रकरणाशी संबंधीत क्रिकेटपटू हे आयसीसीचे पूर्णवेळ सदस्य असलेल्या देशांच्या संघातील आहे, अशी महत्त्वपूर्णक टिप्पणी मार्शल यांनी केली.