IND vs PAK: भारतीय क्रिकेट संघाने धमाकेदार कामगिरी करत पाकिस्तानचा ६ विकेट्सनी दारुण पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल विजयाचे नायक ठरले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १७१ धावा केल्या, पण भारतीय फलंदाजांनी हे आव्हान सहज पूर्ण केले. सामन्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत एका पाकिस्तानी पत्रकाराला सडेतोड उत्तर देत सर्वांचे लक्ष वेधले.

‘भारत-पाकिस्तानमध्ये कोणतीही स्पर्धा नाही’ - सूर्यकुमार यादव

पत्रकार परिषदेत एका वरिष्ठ पाकिस्तानी पत्रकाराने सूर्यकुमार यादवला विचारले की, दोन्ही संघांच्या कामगिरीतील फरक आता खूप मोठा झाला आहे का? यावर सूर्यकुमार यादवने हसतमुख चेहऱ्याने उत्तर दिले की, “सर, माझी तुम्हाला विनंती आहे की आपण आता भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांना ‘प्रतिस्पर्धा’ म्हणणे बंद केले पाहिजे.”

पत्रकाराने ‘प्रतिस्पर्धा’ नव्हे तर ‘दर्जा’ (standards) बद्दल विचारले असल्याचे स्पष्ट केल्यानंतर सूर्यकुमारने पुन्हा एकदा खोचक टिप्पणी केली. सूर्या म्हणाला, “आता स्पर्धा कसली? जर दोन संघांनी १५ सामने खेळले आणि त्यांचा निकाल ८-७ असा असेल, तर ती स्पर्धा असते. पण इथे तर निकाल १३-१ (किंवा १२-३) असा काहीसा आहे. यात कोणतीही समानता नाही.” हे बोलून तो हसू लागला.

गिल आणि अभिषेकचे मनभरून कौतुक

सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमारने आपल्या खेळाडूंचेही मनभरून कौतुक केले. “आपला संघ ज्या पद्धतीने पुढे जात आहे, ते पाहून मी आनंदी आहे. यामुळे माझे काम सोपे होत आहे. पाकिस्तानने सुरुवातीच्या १० षटकांत (९१ धावा) जोरदार फलंदाजी केली, पण आमच्या संघाने संयम गमावला नाही.”

त्यानां एकत्र फलंदाजी करताना पाहणे खूप आनंददायी

सलामीवीर गिल आणि अभिषेकच्या जोडीबद्दल बोलताना सूर्यकुमार म्हणाला, “शुभमन आणि अभिषेक हे अग्नी आणि बर्फाचे मिश्रण आहेत. ते एकमेकांना चांगल्या प्रकारे पूरक आहेत आणि त्यांना एकत्र फलंदाजी करताना पाहणे खूप आनंददायी आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना कोणालातरी १०-१२ षटके फलंदाजी करणे आवश्यक होते आणि त्यांनी तेच केले.”