Sudhir Naik (Photo credit: Twitter @ajinkyasnaik)

भारताचे माजी खेळाडू आणि मुंबईचे माजी कर्णधार सुधीर नाईक (Sudhir Naik) यांचे निधन झाले आहे. त्यांनी 1971 मध्ये मुंबईला रणजी करंडक चॅम्पियन बनवले होते. झहीर खानसह अनेक युवा खेळाडूंचे ते मार्गदर्शक होते. नाईक हे 78 वर्षांचे होते आणि त्यांच्या पश्चात एक मुलगी आहे, जी ऑस्ट्रेलियात राहते. भारतासाठी 1974-75 दरम्यान तीन कसोटी आणि दोन एकदिवसीय सामने खेळलेले नाईक काही आठवड्यांपूर्वी घरी पडले होते. त्यानंतर त्यांना दादर येथील त्यांच्या जवळच्या हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती.

सुधीर यांना गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अखेर बुधवारी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. सलामीवीर, मृदुभाषी नाईक यांनी बर्मिंगहॅम येथे 1974 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी पदार्पणाच्या दुसऱ्या डावात 77 धावा केल्या होत्या. त्यांनी शेवटची कसोटी 1975 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध इडन गार्डन्सवर खेळली होती. नाईक हे मुंबईचे माजी कर्णधार देखील होते आणि त्यांनी 1971 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये संघाचे नेतृत्व केले होते, जेव्हा सुनील गावस्कर आणि अजित वाडेकर यांच्यासह बहुतेक मुंबईचे दिग्गज वेस्ट इंडिजविरुद्धच्या ऐतिहासिक मालिकेत होते.

नाईक हे दीर्घकाळ वानखेडे स्टेडियमचे मुख्य क्युरेटरही होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 85 प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात 7 शतके आणि 27 अर्धशतकांसह 4376 धावा आहेत. देशाचे प्रतिनिधित्व करण्यासोबतच त्यांनी खेळातही मोठे योगदान दिले. त्यांनी मुंबई निवड समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या व्यवस्थापकीय समितीचाही ते भाग होते. ते एक अतिशय जाणकार क्युरेटर होते आणि 2011 च्या विश्वचषकासाठी वानखेडेला तयार करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. (हेही वाचा: IPL 2023: प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राला करोना पॉझिटिव्ह, ट्विटकरुन दिली माहिती)

सुधीर नाईक यांना श्रद्धांजली वाहताना एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे म्हणाले, 'सुधीरजींनी मुंबई क्रिकेटची अनेक प्रकारे सेवा केल्याने त्यांचे जाणे ही कधीही भरून न येणारी हानी आहे. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना.' सचिव अजिंक्य नाईक म्हणाले, सुधीर नाईक यांची फलंदाजी आणि त्यांनी तरुणांना केलेले मार्गदर्शन मुंबईच्या मैदानावर कायम स्मरणात राहील.