SRH vs RCB, IPL 2020: देवदत्त पड्डीकल, एबी डिव्हिलियर्सचा तडाखा! रॉयल चॅलेंजर्सचे हैदराबादला 164 धावांचे आव्हान
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 2020 (Photo Credit: Twitter/IPL)

इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier Leaue) तिसऱ्या सामन्यात डेविड वॉर्नरच्या सनराईजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderbad) सामोरे विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे (Royal Challengers Bangalore) आव्हान आहे. वॉर्नरने टॉस जिंकून आरसीबीला पहिले फलंदाजी करण्यास सांगितले आणि रॉयल चॅलेंजर्सने संधीच सोनं करत निर्धारित 20 ओव्हरमध्ये हैदराबादसमोर 164 धावांचे आव्हान ठेवले. बेंगलोरकडून आयपीएल (IPL) स्पर्धेतील पहिला सामना खेळणाऱ्या 20-वर्षीय देवदत्त पड्डीकलने (Devdutt Padikkal) तुफान फलंदाजी केली. पड्डीकलने सर्वाधिक 56 धावा केल्या, तर एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) 51 धावा केल्या. पडीक्कलने आपल्या पहिल्या आयपीएल सामन्यात निराश केले नाही आणि आरोन फिंचसोबत (Aaron Finch) 90 धावांची भागीदारी करत आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली. या दरम्यान, देवदत्तने 36 चेंडूत 8 चौकारांसह आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दुसरीकडे, हैदराबादकडून टी नटराजन, अभिषेक शर्मा आणि विजय शंकर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. आरसीबीकडून पड्डीकल फलंदाजीने हिरो ठरला. (SRH vs RCB, IPL 2020: आयपीएल इतिहासात RCB ने मैदानात उतरवल्या सर्वाधिक वेळा-वेगळ्या जोड्या, आकडे पाहून डोळे चक्रावतील)

पड्डीकलने ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित ओव्हर टीमचा कर्णधार फिंचसोबत डावाची सुरुवात केली. पड्डीकल फटकेबाजी करत असताना फिंचने संथ सुरुवात केली. देवदत्तने 36 चेंडूत अर्धशतक केले आणि त्यानंतर 56 धावा करत बाद झाला. तर पुढच्याच ओव्हरमध्ये फिंच 29 धावांवर माघारी परतला. सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर आरसीबीच्या मधल्या फळीने निराशा केल्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कर्णधार विराट आणि डिव्हिलियर्सने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण कोहली त्वरित 14 धावांवर बाद झाला. नटराजनने पदार्पणाच्या सामन्यात आरसीबी कर्णधार विराटची मोठी विकेट काढली. डिव्हिलियर्सने त्यानंतर 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. शिवम दुबेसोबत डाव पुढे नेला, पण अर्धशतक पूर्ण केल्यावर एक धाव अधिक घेण्याच्या नादात मनीष पांडेच्या थ्रोवर धावबाद झाला.

दरम्यान, हैदराबादने अपेक्षेप्रमाणे कर्णधार वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टोच्या सलामी जोडीवर आपला विश्वास कायम ठेवला असून अंडर-19 भारतीय संघाचा कर्णधार प्रियम गर्गलाही संघात स्थान दिलय. गेल्या वर्षी आरसीबीविरुद्ध हैदराबादनं जबरदस्त कामगिरी केली होती. हैदराबादचे सलामीचे आणि मधल्या फळीचे फलंदाज दर्जेदार आहेत, मात्र तळाच्या फलंदाजांनी विशेष चांगली कामगिरी केली नाहीत. दुसरीकडे आरसीबीने पहिल्या सामन्यासाठी जोश फिलीपकडे विकेटकिपिंगची जबाबदारी सोपवली असून वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल यांनाही संघात स्थान देण्यात आलंय.