SRH vs KKR IPL 2021: आयपीएल (IPL) 2021च्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderbad) विरुद्ध 10 धावांनी जोरदार विजय मिळवला आणि सीजनची दणक्यात सुरुवात केली. कोलकाता संघाच्या आयपीएल 14 मधील पहिल्या विजयात नितीश राणा (Nitish Rana), राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) आणि गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh Krishna) महत्वाची भूमिका बजावली. राणा आणि त्रिपाठीने बॅटने धावा लुटल्या तर कृष्णाने महत्वपूर्ण विकेट घेत संघाचा विजय निश्चित केला. हैदराबादकडून धावांचा पाठलाग करताना मनीष पांडे (Manish Pandey) 61 धावा आणि अब्दुल समद 19 धावा करून नाबाद परतले तर जॉनी बेयरस्टोने 55 धावांचे योगदान दिले. मोहम्मद नबी 14 धावाच करू शकला. हैदराबादच्या आजच्या सामन्यातील पराभवाने पांडे आणि बेयरस्टो यांची अर्धशतके व्यर्थ ठरली. दुसरीकडे, नाईट रायडर्ससाठी प्रसिद्ध कृष्णाने 2 गडी बाद केले तर आंद्रे रसेल, पॅट कमिन्स आणि शाकिब अल हसन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (SRH vs KKR IPL 2021: केकेआरचा स्टार फलंदाज Rahul Tripathi याचे खणखणीत अर्धशतक, आयपीएलमध्ये केला हा खास विक्रम)
कोलकाताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात काही चांगली झाली नाही. कर्णधार डेविड वॉर्नर 3 धावा करून स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला. त्यानंतर पुढील ओव्हरमध्ये रिद्धिमान साहा देखील क्लीन बोल्ड करत माघारी धाडलं. हैदराबादने पॉवर प्लेमध्ये 2 विकेट्स गमावून 35 धावा केल्या. त्यानंतर बेयरस्टो आणि पांडेने 92 धावंची भागीदारीत करत संघाच्या विजयाच्या असा पल्लवित ठेवल्या. यादरम्यान, बेयरस्टोने सिक्स खेचत 32 चेंडूत अफलातून अर्धशतक पूर्ण केलं. मात्र, अर्धशतक पूर्ण करताच कमिन्सने हैदराबादला तिसरा धक्का दिला आणि बेयरस्टोला 55 धावांवर राणाच्या हाती कॅच आऊट केलं. बेयरस्टोपाठोपाठ नबी देखील माघारी परतला. यानंतर पांडेने अर्धशतक ठोकले पण संघाला विजयीरेष पार करून देऊ शकला नाही.
यापूर्वी नितीश राणा आणि राहुल त्रिपाठीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाताने हैदराबादला विजयासाठी 188 धावांचे आव्हान दिले.नितीश राणाने सर्वाधिक 80 धावांची खेळी केली. तर राहुल त्रिपाठीने 53 धावांची झंझावाती अर्धशतकी खेळी केली. हैदराबादकडून मोहम्मद नबी आणि रशीद खान या फिरकी जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.