SRH vs KKR IPL 2021: कोलकाता नाईट रायडर्सने लागले विजयाचे शतक; CSK, मुंबई इंडियन्सच्या खास क्लबमध्ये सामील होणारी ठरली तिसरी टीम
कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: PTI)

SRH vs KKR IPL 2021: चेन्नईच्या (Chennai) एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या आयपीएल (IPL) 14च्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) डेविड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) 10 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि यंदाच्या आयपीएलमध्ये विजयी सलामी दिली. कोलकाताने हैदराबादला विजयासाठी 188 धावांचे आव्हान दिले जे हैदराबादच्या फलंदाजांना पेलवले नाही आणि संघ 5 विकेट गमावून 177 धावांपर्यंतच मजल मारू शकला. हैदराबादकडून जॉनी बेअरस्टोने 55 तर मनिष पांडे नाबाद 61 धावांची अर्धशतकी खेळी केली पण या दोघांचे प्रयत्न कमी पडले. परिणामी संघाला यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. कोलकाताकडून प्रसिद्ध कृष्णाने दोन तर शाकीब अल हसन, पॅट कमिन्स आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी एक विकेट घेतली. केकेआरचा (KKR) हैदराबादवरील विजय अगदी खास ठरला. नाईट रायडर्सचा आयपीएलमधील हा 100 वा विजय (KKR 100th IPL Win) ठरला आहे. (IPL 2021: KKR ची आयपीएल 14 मध्ये दणक्यात सुरुवात, SRH वर 10 धावांनी केली मात; मनीष पांडेचं अर्धशतक व्यर्थ)

आयपीएलमध्ये आजवर विजयाचे शतक करणारा कोलकाता तिसरा संघ ठरला आहे. यापूर्वी, एमएस धोनीचे चेन्नई सुपर किंग्स आणि पाच वेळा आयपीएल विजेते मुंबई इंडियन्सने 100 किंवा अधिक आयपीएल सामन्यात विजय मिळवला आहे. मुंबईने आजवर सर्वाधिक 118 तर चेन्नईने 106 आयपीएल सामने जिंकले आहेत. कोलकाताने 194 आयपीएल सामन्यात हा कारनामा केला आहेत. सामन्याबद्दल बोलायचे तर, हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने टॉस जिंकून कोलकाता संघाला पहिले फलंदाजीसाठी बोलावले. अशास्थितीत, नितीश राणा आणि राहुल त्रिपाठीच्या दमदार अर्धशतकी खेळींच्या जोरावर कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 187 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात, हैदराबादसाठी बेयरस्टो आणि मनीष पांडेने अर्धशतकी खेळी केली मात्र, ते संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.

दरम्यान, कोलकाता संघाचा पुढील सामना मुंबई इंडियन्सशी चेन्नईमधेच 13 एप्रिल रोजी होईल तर हैदराबाद संघापुढे 14 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे आव्हान असेल. हैदराबाद आणि बेंगलोर संघातील सामना देखील चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जाणार आहे.