हरभजन सिंह, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड़ (Photo Credits: Getty Images)

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय संघाचा 'दिवार' म्हणून ओळख असलेला राहुल द्रविड (Rahul Dravid) सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या क्रिकेट ऑपरेशन समितीचा प्रमुख म्हणून कार्यरत आहे. पण, भारतीय क्रिकेट बोर्ड, बीसीसीआय (BCCI) शिस्तपालन अधिकाऱ्याने हितसंबंध जपण्याचा आरोप लावत द्रविडला नोटीस पाठवली आहे. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्या संजीव गुप्ता यांच्या तक्रारीनंतर बीसीसीआयचे लोकपाल निवृत्त न्यायाधीश डी.के.जैन (DK Jain) यांनी ही नोटीस पाठवली. द्रविडला हितसंबंधाच्या बाबत पाठविलेल्या नोटीसवर आता वाद निर्माण झाला आहे. टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) यांनी या प्रकरणी ट्विटकरत बीसीसीआयचा समाचार घेतला आहे.

गांगुली म्हणाला,''भारतीय क्रिकेटमध्ये सध्या नवीन फॅशन आली आहे. तिचं नाव हेतुसंबंध जपणे असं आहे. चर्चेत राहण्याचा हा सर्वोत्तम मार्ग बनला आहे. देवच आता भारतीय क्रिकेटला वाचवू शकतो.'' गांगुलीच्या या टीकेनंतर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंह यानेदेखील बीसीसीआयचे कान टोचले. तो म्हणाला,''भारतीय क्रिकेटला द्रविडपेक्षा चांगला माणूस मिळू शकत नाही. अशा प्रकारे नोटीस पाठवणे म्हणजे हा त्याचा अपमान आहे. क्रिकेटला त्याची गरज आहे.''

दरम्यान, गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीनुसार द्रविड हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आहे आणि शिवाय तो इंडिया सिमेंट ग्रुपचा उपाध्यक्ष आहे आणि आयपीएलमध्ये त्यांचा चेन्नई सुपर किंग्स संघ खेळत आहे. 16 ऑगस्टपर्यंत द्रविडला उत्तर देण्याचे सांगितले आहे. त्यानंतर त्याला कदाचित जैन यांच्यासमोर सुनावणीसाठी हजर रहावे लागेल. दुसरीकडे, गुप्ता यांनी आधी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीतील सहभागावरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तेंडुलकर आणि लक्ष्मण अनुक्रमे आयपीएलमधील मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे मेंटॉर आहेत.