अक्षय कर्णेवार (Photo Credit: Twitter)

Syed Mushtaq Ali Trophy 2021: दोन्ही हाताने गोलंदाजी करू शकत असलेला फिरकीपटू अक्षय कर्णेवारने सध्या भारतात सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत विदर्भकडून खेळत एक अशी विशेष कामगिरी केली जी आतापर्यंत कोणालाही करता आलेली नाही. कर्णेवारने मणिपूरविरुद्ध 4-4-0-2 अशी गोलंदाजी केली आणि पुरुष टी-20 क्रिकेटमध्ये षटकांच्या पूर्ण कोट्यात शून्य धावा देणारा तो पहिला गोलंदाज ठरला. हा पराक्रम आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधेच नाही तर देशांतर्गत आणि फ्रेंचाइजी T20 क्रिकेटमधेही कधीच कोणत्याही दिग्गज गोलंदाजालाही जमला नाही. विदर्भाने प्रथम फलंदाजी करताना 222/4 धावा करून विरोधी संघाला 55 धावांत गुंडाळल्यानंतर मणिपूरवर 167 धावांनी मोठा विजय नोंदवला.

विदर्भाच्या फलंदाजांच्या एकत्र कामगिरीच्या जोरावर संघाने मणिपूरविरुद्ध धावांचा डोंगर उभा केला. अथर्व तायडेने 46 धावा करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. खालच्या-मधल्या फळीत जितेश शर्मा (71) आणि (16 चेंडूत 49) यांनी अंतिम षटकांमध्ये महत्त्वाच्या धावा काढल्या. याशिवाय गोलंदाजीने अक्षयच्या बॉलिंगच्या अचूक षटकसह इतर सर्व पाच गोलंदाजांनी विकेट्स काढल्या. अक्षय, अथर्व तायडे आणि आदित्य ठाकरे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले तर उर्वरित गोलंदाजांनी एक विकेट घेतली. कर्णेवारने एस लाइफंगबम आणि जॉन्सन सिंह यांच्या विकेट्स घेत मणिपूरच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. अथर्व तायडेने देखील दोन मेडन ओव्हर गोलंदाजी केली. यामुळे विदर्भाने मणिपूरला 55 धावांवर गुंडाळले. अक्षयने टी-20 क्रिकेटमध्ये एकही धाव न खर्च करता चार षटक टाकून नवा विश्वविक्रम केला.

दरम्यान अक्षयपूर्वी मध्य प्रदेशचा अष्टपैलू व्यंकटेश अय्यरनेही याच स्पर्धेत बिहारविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी करताना चार षटकांत केवळ दोन धावा दिल्या होत्या. यादरम्यान त्याने दोन मेडन ओव्हर टाकत दोन विकेट्सही घेतल्या. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात होणाऱ्या आगामी मालिकेसाठी भारताच्या टी-20 संघात त्याचा समावेश केला जाऊ शकतो. उल्लेखनीय म्हणजे भारताचा पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक म्हणून ही मालिका राहुल द्रविडची पहिली मालिका असेल. बीसीसीआयने या मालिकेपूर्वी भारताच्या नवीन टी-20 कर्णधाराची देखील घोषणा करणे देखील अपेक्षित आहे.