(Photo Credit: IANS and Getty Images)

इंग्लंड आणि वेल्स (England and Wales) मध्ये आयोजित 12 वे आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक स्पर्धा संपुष्टात आली आहे. न्यूझीलंड (New Zealand) आणि इंग्लंड संघात रंगलेल्या विश्वकप फायनल सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला. ती देखील टाय झाल्याने सामन्यात सर्वाधिक चौकार मारण्याच्या आधारावर इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले होते. इंग्लंड आणि न्यूझीलंड संघाने फायनलमध्ये पोहचण्यासाठी ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारतीय संघाला (Indian Team), अनुक्रमे सेमीफायनलमध्ये पराभूत केले. (IND vs WI: रोहित शर्मा ते रिषभ पंत; हे 5 खेळाडू बनवू शकतात भारत-वेस्ट इंडिज टी-20 मालिका रंगतदार)

साखळी सामन्यात केवळ 1 सामना गमावलेल्या टीम इंडिया यंदाच्या विश्वकपचा प्रबळ दावेदार मानला जात होता. पण सेमीफायनलमध्ये धक्कादायक पराभवामुळे सर्व चाहत्यांच्या आशा धुळीस मिळाल्या. विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये दाखल झालेला भारतीय संघाचे स्वप्न किवी संघाने भंग केले. पण आता हा पराभव मागे सोडून चार वर्षांनंतर पुन्हा होणाऱ्या विश्वकप स्पर्धेची तयारी आतापासूनच करायला हवी. 2023 मध्ये भारतात आयोजित होणाऱ्या विश्वकप आधी कित्येक नामवंत क्रिकेटपटू खेळातून आपली निवृत्ती घोषित करू शकतात. अशा परिस्थितीत त्या दिग्गज क्रिकेटपटूंची जागा कोण घेणार याबाबत विचार सुरु केला पाहिजे. शिवाय त्यांना त्याप्रमाणे प्रशिक्षण ही दिले पाहिजे. इथे अशाच पाच प्रतिभावान युवा खेळाडूंबद्दल जाणून घेऊया हे पुढील विश्वकपमध्ये भारताचे नेतृत्व करू शकतात:

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)

श्रेयस अय्यर (Photo Credit: Shreyas Iyyer/ Instagram)

भारतीय संघाची मधली फळी सावंत कमकुवत दिसत आहे. विश्वकपमध्ये आघाडीचे फलंदाज बाद होताच मोक्याच्या क्षणी मधली फळी संतोषजनक खेळी करण्यात अपयशी ठरली. आणि म्हणून संध्या संघ मधल्या फळीसाठी सक्षम पर्यायाच्या शोधात आहे. मुंबईकर श्रेयस हा त्यांच्यासमोर असलेला योग्य क्रिकेटपटू आहे. अय्यरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे आणि विराटच्या पुनरागमनानंतर पाचव्या क्रमांकावरही खेळला आहे. आयपीएल (IPL) मध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाच्या नेतृत्वाची धुराही त्याने सक्षमपणे सांभाळली आहे.

शुभमन गिल (Shubhman Gill)

शुभमन गिल (Photo Credit: Shubhman Gill/Instagram)

भारताच्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेनंतर गिल याच्या नावाची चर्चा सर्वांच्या तोंडी होती. पंजाबच्या या फलंदाजाने स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने सातत्याने धावा केल्या आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये देखील सलामीला आल्यानंतर त्यांची खेळी उंचावली आहे. के एल राहुल सह भविष्यात सलामीवीर म्हणून गिल एक पर्याय आहे. शिवाय भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यावेळी त्याने विराटच्या अनुपस्थितीत संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. पण, त्याला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पण, येणाऱ्या काळात तो संघातील एक प्रमुख खेळाडू असेल, हे नक्की.

विजय शंकर (Vijay Shankar)

विजय शंकर (Photo Credits: Getty Images)

यंदाच्या विश्वकपमध्ये शिखर धवन याचा पर्याय म्हणून विजयला भारताच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले होते. आपला पहिला सामना सोडला तर अन्य कोणत्याही संघाविरुद्ध विजयला त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. चाहते देखील त्याच्या निराशाजनक खेळीसाठी त्याला ट्रोल केले आणि रिषभ पंत याला समावेश करण्याची मागणी केली. पण पुढील विश्वचषकपर्यंत विजय आपल्या खेळाचा स्तर नक्कीच उंचावेल आणि भारतीय संघात अतिरिक्त अष्टपैलू म्हणून सहभागी होऊ शकतो. सध्या, पुढील विश्वचषकसाठी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) एक अष्टपैलुचा पर्याय आहे.

पृथ्वी शॉ (Prithvi Shaw)

File Image | पृथ्वी शॉ | Indian Cricket Team | (Photo Credits: Getty Images)

19 वर्षाच्या मुंबईकर पृथ्वीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या पहिल्याच टेस्ट सामन्यात शतक करत शॉने सर्वांची मनं जिंकून घेतली. टेस्ट पदार्पणावेळी शतक झळकावणारा सचिन तेंडुलकर नंतर पृथ्वी हा दुसरा सर्वात तरुण भारतीय आहे. शॉने अजून आपले टी-20 आणि वनडे फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आहे. पण त्याची आयपीएल मधील कामगिरी पाहता शॉ एक उत्कृष्ट खेळाडू सिद्ध होईल यात काही शंका नाही. 2019च्या आयपीएलमध्ये त्याने 352 धावा केल्या.

श्रेयस गोपाल (Shreyas Gopal)

श्रेयस गोपाल (Photo Credit: Shreyas Gopal/ Instagram)

यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) साठी प्रभावी खेळी करत कर्नाटकच्या या गोलंदाजाने सर्वांना खुश केले. गोपालने अगदी मोक्याच्या क्षणी विकेट्स घेत संघाचे आव्हान टिकवून ठेवले होते. त्याच्या फिरकी सामोर दिग्गज क्रिकेटपटूंनी देखील शरणागती पत्करली होती. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युझवेन्द्र चहल (Yuzvendra Chahal) यांच्या व्यतिरिक्त गोपाल देखील एक पर्याय आहे.