World Cup 2003 मध्ये भारत विरुद्ध झालेल्या पराभवाबद्दल शोएब अख्तर याने केला धक्कादायक खुलासा, सामन्यापूर्वी घेतले होते पाच इंजेक्शन्स
शोएब अख्तर (Photo Credit: Video Screen Grab)

भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील स्पर्धेमुळे क्रिकेटचा रोमांच नेहमीच दुप्पट होतो. दोन्ही संघांनी बर्‍याच संस्मरणीय विजयांची नोंद केली आणि तर अनेक पराभवाचा सामना देखील केला आहे. आणि जर विश्वचषकबद्दल बोलले तर तेथे एकच विजेता आहे आणि तो म्हणजे टीम इंडिया. भारत आणि पाकिस्तान विश्वचषकमध्ये 7 वेळा आमने-सामने आले आहेत. आणि एकही विजय न मिळवता, पाकिस्तानला भारताकडून सात वेळा पराभवाचा सामना करावा लागला. या दोन देशांतील विश्वचषकाचा सामना तर तो कोण विसरू शकेल. 2003 मध्ये दक्षिण आफ्रिका (South Africa) मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना तर सर्वांच्या लक्षात असेलच. या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने 98 धावांची खेळी केली होती. पण आता आठवणींची पाने उलगडत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने पाच इंजेक्शन्स घेतल्याचे समोर आले आहे. ही गोष्ट सांगितली आहे ती खुद्द अख्तरने.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवरवरील व्हिडिओमध्ये म्हटले की, 2003 विश्वचषकमध्ये भारताकडून मिळालेला पराभव हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात निराशाजनक सामना होता. 2003 च्या विश्वचषकात टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत केले होते, शिवाय भारतीय फलंदाजांनी अख्तरची धुलाई केली होती. अख्तर म्हणाला, "माझ्या संपूर्ण कारकीर्दीतील सर्वात निराशाजनक सामना 2003 च्या विश्वचषकात भारताविरुद्ध सेंचुरियनमधील होता. आमचा गोलंदाजीचा हल्ला शानदार असला तरीही आम्ही 274 च्या लक्ष्याचा बचाव करू शकलो नाही."

शिवाय अख्तरने या सामन्याबाबत अजून एक उलगडा केला आहे. अख्तर म्हणाला की,"सामन्यापूर्वीच्या रात्री माझा डावा गुडघा दुखत होता. पण मला भारताविरुद्ध सामन्यात खेळायचे होते. त्यावेळी मी डाव्या गुडघ्यामध्ये पाच इंजेक्शन्स घेतले होते. त्यावेळी माझा गुडघा सुन्न पडला होता. त्यामुळे सामन्यात मला शंभर टक्के कामगिरी करता आली नाही."