वेगवान गोलंदाज अष्टपैलू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) म्हणतो की टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) संघात स्थान न मिळणे हा त्याच्यासाठी मोठा धक्का आहे. रांचीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी त्याने सांगितले की, त्याच्यामध्ये अजूनही क्रिकेट शिल्लक आहे. टीम इंडिया येथे तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळत आहे. ते मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहेत. शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखालील संघ या सामन्यात हरला तर मालिका गमवावी लागेल. आगामी सामन्यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे शार्दुलने सांगितले. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत ठाकूरने भारतासाठी टी-20 सामने खेळले, परंतु त्यादरम्यान त्याची कामगिरी फारशी प्रभावी ठरली नाही आणि त्याला राष्ट्रीय संघातून वगळण्यात आले. तो म्हणाला, “प्रत्येक खेळाडूचे विश्वचषक खेळण्याचे आणि जिंकण्याचे स्वप्न असते. पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक आहे. त्यासाठी मी तयारी करेन."
भारतीय गोलंदाजांचा केला बचाव
अलीकडच्या काही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी निराशा केली आहे. यावर शार्दुलने साथीदारांचा बचाव केला. तो म्हणाला, 'फक्त भारतीय गोलंदाजांवर टीका करणे योग्य नाही. विरोधी संघाच्या गोलंदाजांमध्येही त्रुटी आहेत. भारतासाठी एकतर्फी सामना झाला नाही. आम्ही बहुतांश सामने जिंकले असून सातत्य दाखवले आहे. कधी-कधी एकदिवसीय सामन्यात 350 पेक्षा जास्त धावाही होतात. (हे देखील वाचा: T20 World Cup 2022: सराव व्यतिरिक्त टीम इंडिया या गोष्टींवरही करत आहे काम, भारताचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक सोहम देसाई यांनी दिली माहिती)
केशव महाराजला धोनीची झाली आठवण
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराज म्हणाले की, भारताकडे रोहित शर्मा आणि विराट कोहली नसले तरी शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघ जागतिक दर्जाचा आहे. “मी धवनच्या संघाला द्वितीय श्रेणी म्हणणार नाही. भारताकडे इतकं टॅलेंट आहे की ते आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी चार-पाच एकदिवसीय संघ उभे करू शकतात. अनेक खेळाडूंना आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. रांची हे महेंद्रसिंग धोनीचे मूळ गाव आहे. मला त्याच्याशी बोलायला आवडेल. मला त्याच्यासोबत किंवा त्याच्या विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली नाही.