IND vs AUS 4th Test 2024: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना मेलबर्नमध्ये (Melbourne) खेळवला जात आहे. जिथे ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयानंतर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर सॅम कॉन्स्टासने (Sam Konstas) शानदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. या सामन्यातून त्याने ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले आहे. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने अनेक विक्रम केले. या खेळीदरम्यान सॅम कॉन्स्टासने भारतीय स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला लक्ष्य केले आणि त्याच्याविरुद्ध अनेक धावा केल्या. दरम्यान, त्याने तीन खास विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
बुमराहविरुद्ध केला 'हा' पराक्रम
जसप्रीत बुमराहविरुद्ध सॅम कॉन्स्टासने चमकदार कामगिरी केली. बुमराहविरुद्ध धावा करणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नसते, पण या 19 वर्षीय खेळाडूने बुमराहविरुद्ध धावा सहज केल्या. या सामन्यात त्याने दोन षटकार मारले. त्याने हे दोन्ही षटकार जसप्रीत बुमराहविरुद्ध मारले आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बुमराहला दोन षटकार मारणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला. त्याच्या आधी फक्त जोस बटलरने अशी कामगिरी केली होती.
बुमराहविरुद्ध मारले एकूण 6 चौकार
याशिवाय त्याने बुमराहविरुद्ध एकूण 6 चौकार मारले. कसोटी क्रिकेटच्या एका डावात बुमराहविरुद्ध कोणत्याही फलंदाजाने केलेली ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. तर सॅम कॉन्स्टासने जसप्रीत बुमराहविरुद्ध कसोटीत एका डावात चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा केल्या. बुमराहविरुद्धच्या या सामन्यात त्याने 33 चेंडूत 34 धावा केल्या.
जसप्रीत बुमराहविरुद्ध कसोटीत एका डावात सर्वाधिक धावा:
45(68) - जो रूट, लॉर्ड्स, 2021
39(63)- ॲलिस्टर कुक, द ओव्हल, 2018
38(46)- स्टीव्ह स्मिथ, सिडनी, 2021
34(33) - सॅम कोन्स्टास, मेलबर्न, 2024
जसप्रीत बुमराहविरुद्ध कसोटीत सर्वाधिक चौकार:
7 - ख्रिस वोक्स, द ओव्हल, 2021
6 - सॅम कोन्स्टास, मेलबर्न, 2024
6 - फाफ डु प्लेसिस, केप टाउन, 2018