भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा केवळ टीम इंडियाचाच सुपरस्टार फलंदाज म्हणून ओळखला जात नाही, तर त्याने त्याआधी प्रसिद्ध असलेल्या मुंबई क्रिकेटलाही अधिक उंचीवर नेऊन ठेवले होते. मुंबईच्या मैदानातून आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या सचिनने आपले संपूर्ण देशांतर्गत क्रिकेट सामने मुंबईसाठी खेळले. सचिननंतर त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) यानेही मुंबईतूनच आपल्या क्रिकेटमधील करिअरला सुरुवात केली. मात्र आता तो मुंबई क्रिकेट सोडण्याच्या तयारीमध्ये आहे.
पीटीआय-भाषा या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली कारकीर्द घडवण्यासाठी मुंबई क्रिकेटऐवजी दुसऱ्या संघाचा भाग होण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अर्जुनने त्याच्या होम असोसिएशन मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्रासाठी (NOC) अर्ज केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या देशांतर्गत क्रिकेट हंगामात गोव्याकडून खेळताना दिसणार आहे.
या संदर्भात सचिन तेंडुलकरच्या एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीच्या वतीने निवेदन जारी करण्यात आले असून, अर्जुनला खेळण्यासाठी जास्तीत जास्त संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे, असे एजन्सीने निवेदनात म्हटले आहे, त्याचवेळी गोवा क्रिकेट असोसिएशनही या प्रकरणात रस दाखवत असून ज्युनियर तेंडुलकरला राज्य संघात स्थान मिळू शकते, असे त्यांनी म्हटले आहे.
गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सूरज लोटलीकर यांनी पीटीआयला सांगितले की, ‘आम्ही डावखुरा वेगवान गोलंदाज शोधत आहोत. म्हणूनच आम्ही अर्जुन तेंडुलकरला गोवा संघात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. हंगामापूर्वी आम्ही मर्यादित षटकांचे सराव सामने खेळू आणि तो या सामन्यांमध्ये खेळेल. या सामन्यातील त्याच्या कामगिरीच्या आधारे निवड समिती त्याला संघात ठेवण्याचा निर्णय घेतील. (हेही वाचा: Rohit Sharma: एका वर्षात सर्वाधिक विजय मिळवणारा रोहित शर्मा ठरला देशाचा पहिला कर्णधार, धोना आणि कोहलीला टाकले मागे)
22 वर्षीय अर्जुन तेंडुलकर मुंबई क्रिकेट संघात आपले स्थान निर्माण करण्यात अपयशी ठरला आहे. भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईमध्ये अनेक उत्कृष्ट, प्रतिभावान क्रिकेटपटू आहेत आणि अशा परिस्थितीत अर्जुनला स्वतःचे स्थान निर्माण करणे सोपे नव्हते. तो सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग आहे, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.