सचिन तेंडुलकरने हटके स्टाईलमध्ये दिल्या बालमित्र विनोद कांबळी याला वाढदिवसाच्या शुभेच्छा! (Photo)
Sachin Tendulkar and Vinod Kambli (Photo Credit: Twitter)

मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विनोद कांबळी (Vinod Kambli) यांची घनिष्ट मैत्री जगजाहीर आहे. आज विनोद कांबळीचा 47 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त सचिनने आपल्या बालमित्राला खास शुभेच्छा दिल्या आहेत. सेलिब्रेशनच्या फोटो ट्विट करत खास मेसेज लिहित सचिनने विनोद कांबळी  याला शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिन आणि विनोद लहानपणी एकत्र क्रिकेट खेळले आहेत. 1988 मध्ये शाळेतील मॅचमध्ये दोघांनी 664 धावांची भागिदारी केली होती. त्यानंतर त्यांची वाटचाल आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे झाली. विनोद कांबळी भारताकडून 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळला आहे. मात्र त्यानंतर वाईट कामगिरीमुळे विनोद कांबळी संघातून बाहेर पडला तर सचिन क्रिकेट विश्वातील देव बनला.

नऊ वर्षांपूर्वी विनोद कांबळीने एका टीव्ही शो दरम्यान सचिनविरुद्ध केलेल्या वक्तव्यामुळे दोघांत काही वर्षे अबोला होता. 2013 मध्ये कसोटी सामन्यातून निवृत्ती घेतल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या निरोपसमारंभाला कांबळीला आमंत्रित करण्यात आले नव्हते. इतकंच नाही तर सचिनच्या आत्मचरित्रात 'प्लेईंग इट माय वे' (Playing it My Way) मध्येही सचिनने आपल्या या बालमित्राचा उल्लेख केलेला नाही. मात्र कालांतराने चित्र पालटले आणि पुन्हा या दोघांत मैत्रीचे नाते तयार झाले.