ट्वेंटी -20 क्रिकेट (T20I Cricket) हळूहळू क्रिकेटच्या जगावर राज्य करीत आहे. प्रत्येक देशात, स्थानिक टी-20 लीगचे आयोजन करण्यात येते. क्रिकेटच्या छोट्या स्वरूपामध्ये खळबळ आणि निखळ मनोरंजन हे यामागील मुख्य कारण मानले जाते. चाहत्यांप्रमाणेच भारतीय खेळाडूंना देखील टी-20 भुरळ पडली आहे. 2003 मध्ये इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) पहिल्यांदा व्यावसायिक स्तरावर इंटर-काउंटी स्पर्धेतून या फॉरमॅटची क्रिकेट विश्वाला ओळख करून दिली. पण 2007 टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपने याला महत्व मिळवून दिले. जेव्हा आपण इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) लोकप्रियतेचा विचार करता तेव्हा हे स्पष्ट होते. आजवर अनेक खेळाडूंनी 100 पेक्षा अधिक टी-20 सामने खेळले आहेत, पण असे काही दिग्गज आहेत ज्यांच्यासाठी पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना अखेरचा ठरला. (Asia Cup 2021 झाल्यास आपल्या 'बी' संघाला मैदानात उतरवणार Team India, IPL मध्ये ताबडतोड कामगिरी करणाऱ्या ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी)
1. दिनेश मोंगिया (Dinesh Mongia)
माजी डावखुरा फलंदाज दिनेश मोंगिया त्यांच्या कारकीर्दीत फक्त एक टी-20 सामना खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंपैकी आहे. त्याने 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी -20 गेम खेळला जो मोंगियाचा या फॉरमॅटमधील अखेरचा ठरला. 1 डिसेंबर 2006 रोजी जोहान्सबर्ग येथे हा सामना रंगला जो भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिला टी-20 होता. मोंगिया तिसर्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने 45 चेंडूंत 38 धावा केल्या. त्याच्या खेळीत चार चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. अखेर भारताने हा सामना 6 विकेटने जिंकला.
2. राहुल द्रविड (Rahul Dravid)
माजी कर्णधार राहुल द्रविडदेखील आपल्या तेजस्वी क्रिकेट करिअरमध्ये एक टी-20 सामना खेळून या यादीत स्थान मिळवले आहे. 2011 मध्ये द्रविडने इंग्लंड विरोधात पहिला व अखेरचा टी-20 सामना खेळला. मँचेस्टर येथे द्रविडने 21 चेंडूंत वेगवान 31 धावा केल्या आणि आपल्या खेळीत त्याने इंग्लिश गोलंदाज समीत पटेलविरुद्ध सलग तीन षटकार ठोकले.
3. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)
2006 मध्ये जेव्हा टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळला होता तेव्हा सचिन तेंडुलकरने छोट्या फॉर्मेटमध्ये पदार्पण केलं होतं. तथापि, हा त्याचा आतापर्यंतचा पहिला आणि शेवटचा टी-20 सामना ठरला. त्या सामन्यात सचिन मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला आणि त्याने 12 चेंडूत 10 धावा करून तंबूत परतला. अखेर हा सामना जिंकण्यात भारताला यश आले आणि सचिनच्या कारकिर्दीतील हा पहिला व अखेरचा टी-20 सामना ठरला.