सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

मैदानावर तणाव आणि विजय-पराभवाची चिंता असली तरी ड्रेसिंग रूममध्ये नेहमीच आनंददायी असले पाहिजे. जगात क्रिकेट खेळणारा प्रत्येक संघ हा फंडा वापरतो. म्हणूनच वेळोवेळी बऱ्याच सुखद किंवा मजेदार आठवणी बाहेर येतात. अशीच एक गमतीशीर घटना सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) एका यूट्यूब वाहिनीशी संभाषणात शेअर केली. सचिनने आपल्या खेळण्याच्या दिवसातील एक मजेदार किस्सा सुनावला जेव्हा ज्येष्ठ राष्ट्रीय संघाबरोबर विराट कोहलीची (Virat Kohli) त्याच्या पहिल्या मालिकेदरम्यान ड्रेसिंग रूममध्ये कशी खोड काढली याबाबत खुलासा केला. ऑगस्ट 2008 मध्ये टीम इंडिया (Team India) डेब्यू करणाऱ्या कोहलीला भारतीय संघातील नवख्या खेळाडूंना मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पाय पडून आशीर्वाद घ्यावा लागतो असं त्याचे माजी सहकारी-युवराज सिंह, मुनाफ पटेल आणि इरफान पठाण यांनी पटवून दिले होते. याबाबत तेंडुलकर म्हणाले की, कोहली त्याच्या पाया पडला तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले आणि काय घडत आहे हे कळलेच नाही. (Mohammad Yousuf On Virat Kohli: विराट कोहली याच्या उत्कृष्ट कामगिरीचे रहस्य काय? पाकिस्तानचे माजी फलंदाज मोहम्मद युसूफ यांनी सांगितले कारण)

सचिनने यूट्यूब शो LegendsWithUnacademy च्या संभाषणात सांगितले की, “काय होत आहे ते मला माहित नव्हते. मी त्याला विचारले 'तू काय करीत आहेस?'. त्याला सांगितले की याची गरज नव्हती आणि अशा गोष्टी घडत नाहीत. मग तो उठला आणि आम्ही त्या मुलांकडे पाहिले, ते हसू लागले.” यापूर्वी गौरव कपूरच्या Breakfast with Champions च्या मुलाखतीत विराटने देखील या घटनेची पुष्टी करत त्याच्या माजी साथीदारांनी त्याची कशी खोड काढली याबाबतचा किस्सा सुनावला होता. “निवड झाल्यानंतर, सुरुवातीचे दोन दिवस मला ड्रेसिंग रूममध्ये सचिनला भेटायचे होते. आणि या लोकांना माझी उत्सुकता कळली होती कारण मी ते एखाद्याला सांगितले होते,” युवराज, मुनाफ, हरभजन सिह आणि इरफान यांनी त्यांची खोड काढल्याची पुष्टी करत त्याने म्हटले. आपल्या 24 वर्षांच्या कारकीर्दीत सचिन भारतीय राष्ट्रीय संघाचा चेहरा राहिला आणि मास्टर-ब्लास्टरनेही भारताच्या दुसर्‍या वर्ल्ड कप विजयात मोलाची भूमिका बजावली होती.

याशिवाय, सचिनने 2011 वर्ल्ड कप विजयाची आठवण काढत तो आपल्या कारकिर्दीतील “सर्वोत्कृष्ट क्रिकेट क्षण” असल्याचे सांगितले. वानखेडे स्टेडियमवर श्रीलंका विरोधात विजयानंतर युसुफ पठाण आणि कोहलीने जेव्हा त्याला आपल्या खांद्यावर उचलले तेव्हा त्यांना खाली पडण्याची चिंता वाटत असल्याचेही माजी भारतीय कर्णधाराने खुलासा केला. सचिनने 2011 विश्वचषक विजयाचे अविश्वसनीय अनुभव म्हणून वर्णन केले.