RR vs SRH, IPL 2020: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या सत्राचा 40वा सामना दुबई येथे राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळला जात आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघांना विजय मिळवणे महत्वाचे असताना रॉयल्सने टॉस गमावरून पहिले फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 154 धावांपर्यंत मजल मारली. रॉयल्ससाठी आजच्या सामन्यात संजू सॅमसनने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. बेन स्टोक्सने 30 धावांचे योगदान दिले. आजच्या सामन्यात सनरायजर्स गोलंदाजांनी राजस्थान रॉयल्सवर सुरुवातीपासून वर्चस्व कायम ठेवले आणि त्यांच्या धावसंख्येला वेसण घातले. हैदराबादसाठी आज पहिला सामना खेळणाऱ्या जेसन होल्डरने (Jason Holder) सर्वाधिक 3 तर विजय शंकर आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. (IPL 2020: आयपीएल दे दणादण! 13व्या हंगामात कोणत्या 10 खेळाडूंनी ठोकले सर्वात मोठे षटकार, जाणून घ्या)
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत राजस्थान संघाला चांगली सुरुवात मिळाली, पण सलामी फलंदाज रॉबिन उथप्पा 19 धावा करून माघारी परतला. होल्डरने उथप्पाला धावबाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यांनतर स्टोक्सने संजू सॅमसनसह मिळून अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला. त्यांनतर सॅमसन 26 चेंडूत 36 धावा करून होल्डरच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. स्टोक्सला राशिद खानने बोल्ड करून पॅव्हिलिअनचा रास्ता दाखवला. स्टोक्सने32 चेंडूत 30 धावा केल्या. त्यानंतर रॉयल्स नियमित अंतराने विकेट गमावत राहिले. जोस बटलर 12 चेंडूत 9 धावा करून विजय शंकरच्या चेंडूवर शहबाज नदीमकडे झेलबाद झाला. 19व्या ओव्हरच्या पहिल्या दोन चेंडूवर होल्डरने रॉयल्सना दोन मोठे झटके दिले. पहिल्या चेंडूवर स्मिथला 15 चेंडूत 19 धावा करून मनीष पांडेकडे कॅच आऊट केले तर पुढील चेंडूवर रियान पराग 20 धावा करून डेविड वॉर्नरकडे झेलबाद झाला. अखेर जोफ्रा आर्चर आणि राहुल तेवतियाने राजस्थानला धावांपर्यंत मजल मारून दिली. आर्चर नाबाद 16 आणि तेवतिया नाबाद 2 धावा करून परतले.
दुसरीकडे, प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दोन्ही संघांना आजचा सामना जिंकणं गरजेचं आहे. गुणतालिकेत राजस्थान टीम सहाव्या तर हैदराबाद टीम सातव्या क्रमांकावर आहे. राजस्थानने 10 पैकी 4 सामने जिंकले आहेत, तर हैदराबादला 9 पैकी फक्त 3 सामने जिंकता आलेले आहेत.