RR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड! 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ
संजू सॅमसन विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब (Photo Credit: PTI)

आयपीएलच्या (IPL) नवव्या सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करत किंग्स इलेव्हन पंजाबने (Kings XI Punjab) 2 विकेट गमावून दिलेल्या 224 धावांच्या प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) 4 विकेटने रोमहर्षक विजय मिळवला आणि पंजाबला धोबीपछाड दिला. आयपीएल 13 मधील राजस्थानचा हा दुसरा विजय ठरला. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात मोठा 'रनचेस' ठरला. राजस्थानकडून पंजाबने दिलेल्या विशाल लक्ष्याच्या पाठलाग करताना संजू सॅमसनने (Saju Samson) अर्धशतकी डाव खेळला आणि सर्वाधिक 85 धावा केल्या. कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) अर्धशतक करून 50 धावांवर माघारी परतला. राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) 53 धावा केल्या. दुसरीकडे, पंजाबकडून मोहम्मद शमीने 3, जेम्स नीशम, मुरुगन अश्विन आणि शेल्डन कॉटरेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. दरम्यान, पहिल्या सामन्यात पराभवानंतर पंजाबचा सलग दुसरा विजय ठरला. यापूर्वी त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध विजय मिळवला होता. दुसरीकडे, किंग्स इलेव्हन पंजाबचा हा दुसरा पराभव ठरला. (RR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस Watch Video)

राजस्थानकडून आजच्या सामन्यात जोस बटलर आणि कर्णधार स्मिथने डावाची सुरूवात केली. पण यंदा आयपीएलमधील पहिला सामना खेळणाऱ्या बटलरने निराश केले आणि 4 धावांवर बाद झाला. त्यांनतर स्मिथ आणि सॅमसनने डाव सावरला. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली आणि टीमचा स्कोर 100 च्या पार नेला. या दरम्यान स्मिथने अर्धशतक केले, पण तो डाव पुढे नेऊ शकला नाही आणि माघारी परतला. त्यांनतर संजूने सलग दुसरे अर्धशतक केले आणि राजस्थानच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, शमीने त्याला बाद करून टीमला मोठे यश मिळवून दिले. संजू बाद झाल्यावर राजस्थानच्या विजयाच्या आशा हळुहळू दिशेनाश्या होत असताना तेवतियाने आपला गियर बदलला आणि कॅटरेलच्या ओव्हरमध्ये पाच षटकार ठोकले. तेवतिया 53 धावा करून बाद झाला. टॉम कुरनने विजयी षटकार ठोकला. जोफ्रा आर्चर 3 चेंडूत 13 धावांवर नाबाद परतला.

यापूर्वी, किंग्ज इलेव्हन पंजाबने पहिले फलंदाजी केली आणि दोन विकेट गमावून 223 धावा केल्या. मयंक अग्रवालने संघासाठी 50 चेंडूत 106 धावा फटकावल्या, ज्यामध्ये त्याने 10 चौकार आणि सात षटकार ठोकले.त्याच्याशिवाय कर्णधार लोकेश राहुलने 54 चेंडूत सात चौकार आणि एका षटकारासह 69 धावांचे योगदान दिले. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 183 धावांची भागीदारी केली. निकोलस पूरनने नाबाद 25 आणि ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 13 धावा केल्या. राजस्थानकडून अंकित राजपूत आणि टॉम कुरन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.