सध्याच्या पिढीतील एक सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि सर्वकाळचा सर्वोत्कृष्ट व्हाइट बॉल फलंदाज म्हणून प्रसिद्धी मिळवलेला रोहित शर्मा (Rohit Sharma) आज आपला 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. जून 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रोहितने 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलामी फलंदाज म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर क्रिकेट कारकिर्दीत विक्रमी कामगिरीची नोंद केली आहे. तेव्हापासून 'हिटमॅन' (Hitman) म्हणून प्रसिद्ध रोहितने वनडे क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतकं, टी-20 मध्ये चार शतकं आणि कसोटी क्रिकेटमध्ये सलामी फलंदाज म्हणून पदार्पणात दुहेरी शतक ठोकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. रोहित सध्या भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार असूनही त्याच्या नेतृत्वात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संघ मुंबई इंडियन्सने चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. रोहितने आतापर्यंतच्या 363 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. (Happy Birthday Rohit Sharma: वनडे क्रिकेटमध्ये 3 दुहेरी शतकं, एका डावात सर्वाधिक षटकार; 'हिटमॅन' रोहित शर्मा याने नोंदवले आहे 'हे' 10 खास रेकॉर्ड)
आक्रमकता आणि स्फोटक फलंदाजीची तुलना बर्याच वेळा सर विवियन रिचर्ड्स आणि वीरेंद्र सहवागशी यांच्याशी केली जाते. आज 'हिटमॅन' आपला 33 वा वाढदिवस साजरा करत असताना रोहितविषयी तथ्ये जाणून घेऊया ज्यापासून आपण अज्ञात आहात:
1. रोहितने ऑफ स्पिनर म्हणून सुरुवात केली. मात्र, त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्याच्या फलंदाजीचे कौशल्य ओळखले आणि त्याचे योग्य फलंदाज म्हणून रूपांतर केले.
2. रोहित इंग्रजी, हिंदी, मराठी आणि तेलगू या चार भाषांमध्ये अस्खलितपणे संभाषण करू शकतो.
3. आयपीएलचे पाच विजेतेपद जिंकणारा आणि आयपीएलच्या दोन वेगवेगळ्या संघांसह चार विजेतेपद जिंकणारा रोहित पहिला क्रिकेटर आहे.
4. फलंदाजी व्यक्तिरिक्त रोहितच्या नावावर गोलंदाज म्हणून एक हॅटट्रिकचीही नोंद आहे. त्याने 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळत मुंबई इंडियन्सविरुद्ध हा पराक्रम केला होता.
5. सुरेश रैना नंतर क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-20) शतक करणारा शर्मा दुसरा क्रिकेटपटू आहे.
दरम्यान, रोहितने आतापर्यंत 224 कसोटी, 107 टी -20 आणि 32 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड सध्या त्याच्या नावावर आहे. तसेच रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतकं ठोकणारा एकमेव फलंदाज आहे.