ICC Test Ranking: विराट कोहलीचे पाचवे स्थान कायम, Rishabh Pant फलंदाजांच्या टॉप-10 मध्ये प्रवेश करणारा बनला पहिला भारतीय विकेटकीपर
रिषभ पंत (Photo Credit: PTI)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी (5 मे) ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. आयसीसीची ताजी टेस्ट रँकिंग (ICC Test Rankings) जाहीर झाल्यानंतर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. पंतने टॉप-10 फलंदाजांच्या यादीत 747 गुणांसह एंट्री केली आहे. त्यामुळे आयसीसी टेस्ट क्रमवारीच्या पहिल्या 10 फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवणारा रिषभ पंत पहिला भारतीय विकेटकीपर ठरला आहे. पंतपूर्वी एमएस धोनी किंवा अन्य कोणत्याही विकेटकीपर-फलंदाजाला हा कारनामा करता आलेला नाही आहे. यापूर्वी फारुख इंजिनियर (Farookh Engineer) यांनी प्रामुख्याने यष्टीरक्षक म्हणून कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत सर्वोत्तम 17 वे स्थान मिळवले होते.

इंजिनियर यांच्यानंतर एमएस धोनीने (MS Dhoni) याच क्रमवारीत सर्वोत्तम 19 वा क्रमांक पटकावला होता. पंतने 2020-21 ऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर इंग्लंडविरुद्ध मायदेशात झालेल्या तीनही क्रिकेट मालिकांमध्येही दमदार प्रदर्शन केले. दरम्यान, आयसीसीच्या क्रमवारीत पंतसह सहाव्या क्रमांकावर भारताचा सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि न्यूझीलंडचा फलंदाज हेन्री निकोल्स देखील संयुक्तपणे विराजमान आहेत. त्यांचेही प्रत्येकी 747 गुण आहेत. तसेच भारतीय कर्णधार विराट कोहलीचे क्रमवारीतील पाचवे स्थान कायम राहिले आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने 919 गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थानावर असून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ 891 गुणांसह दुसर्‍या क्रमांकावर विल्यमसनला कठोर स्पर्धा देत आहे. तिसऱ्या क्रमांकावर मार्नस लाबूशेन आणि चौथ्या क्रमांकावर जो रुट आहे. विशेष म्हणजे आयसीसी कसोटी फलंदाजांच्या पहिल्या दहा क्रिकेटपटूंमध्ये तीन भारतीय खेळाडू सामील आहेत.

गोलंदाजी विभागात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने 908 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहेत. त्याच्या मागे 850 गुणांसह भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आहे. कसोटी गोलंदाजीच्या पहिल्या दहामध्ये अश्विन हा एकमेव भारतीय आहे. अष्टपैलू क्रमवारीत सर्व टॉप-10 खेळाडूंनी आपले स्थान कायम राखले आहे.जेसन होल्डर 423 णांसह अव्वल स्थानावर असून इंग्लंडचा बेन स्टोक्स (393 अंक), रवींद्र जडेजा (386) आणि अश्विन (353) त्याच्या मागे आहेत.