पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडकीस, फवाद हुसेन यांच्या आरोपांवर श्रीलंकेचे क्रीडामंत्री हरीन फर्नांडो यांनी दिले स्पष्टीकरण
Sri Lanka Team( Getty Images)

श्रीलंका (Sri Lanka) क्रिकेट संघातील ज्येष्ठ खेळाडूंनी पाकिस्तान (Pakistan) दौरा करण्यास नकार दिला आहे. यानंतर पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद हुसेन चौधरी (Fawad Hussain Chaudhry) यांनी या साठी भारताला दोषी ठरवले आहे. श्रीलंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्यानंतर फवाद हुसेन चौधरी यांनी म्हटले आहे की भारताने श्रीलंकेच्या खेळाडूंना पाकिस्तानला न येण्याची धमकी दिली आहे आणि म्हणूनच श्रीलंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तानात येण्यास नकार दिला आहे. यानंतर आता श्रीलंकेचे क्रीडामंत्री हरीन फर्नांडो (Harin Fernando) यांनी पाकिस्तानला योग्य प्रत्युत्तर दिले आहे. फवाद चौधरी यांच्या ट्विटला उत्तर देताना श्रीलंकेचे क्रीडामंत्री फर्नांडो यांनीही एक ट्विट केले आणि आपली भूमिका स्पष्ट केली. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौर्‍यापासून माघार घेतलेल्या खेळाडूंमध्ये वनडे कर्णधार दिमुथ करुणारत्ने, टी-20 कर्णधार लसिथ मलिंगा, माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल परेरा, धनंजय डी सिल्वा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल, दिनेश चांदिमल यांचा समावेश आहे. (PAK vs SL: श्रीलंका क्रिकेट संघातील Lasith Malinga, Angelo Mathews सह 'या' खेळाडूंनी सुरक्षेचे कारण देत घेतली पाकिस्तान दौऱ्यातुन माघार)

फर्नांडो यांनी ट्विटमध्ये लिहिले, "श्रीलंकेच्या खेळाडूंनी भारतामुळे पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आहे यात काही तथ्य नाही. त्यांनी पुढे असेही लिहिले आहे की 2009 मधील घटनेमुळे काही खेळाडूंनी नकार दिला आहे. आम्ही खेळाडूंच्या या निर्णयाचा आदर करतो. याद्वारे आम्ही पाकिस्तानात जाण्यास तयार असलेल्या खेळाडूंचा संघ निवडू. आमच्याकडे पूर्ण सामर्थ्य असणारी टीम असून पाकिस्तानमध्येच पाकिस्तानला पराभूत करण्याची आमची आशा आहे."

श्रीलंकेचे खेळाडू पाकिस्तानमध्ये गेले तर त्यांचा आयपीएल करार संपुष्टात येईल, असेही भारताने म्हटले आहे, असा दावाही चौधरी यांनी केला होता. आपल्या ट्विटमध्ये चौधरी म्हणाले की, "एका क्रीडा भाष्यकर्त्याने मला सांगितले की, भारताने श्रीलंकेच्या खेळाडूंना पाकिस्तानात खेळायला गेल्यास त्यांचा आयपीएल करार रद्दबातल करण्याची धमकी दिली आहे. हे एक नीच कृत्य आहे. त्याचा निषेध केला पाहिजे. भारतीय क्रीडा अधिका-यांचे हे वर्तन निंदनीय आहे."  दुसरीकडे, सोमवारी पाकिस्तान दौर्‍यावरुन कमीतकमी 10 श्रीलंकेच्या खेळाडूंनी नावे मागे घेतली आहेत. श्रीलंकेला सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान दौर्‍यावर मर्यादित षटकांची मालिका खेळायची आहे.