PBKS vs DC IPL 2021 Match 29: शिखर धवनचा अर्धशतकी धमाका, दिल्लीचा पंजाब किंग्सला 7 विकेटने धोबीपछाड!
शिखर धवन (Photo Credit: PTI)

PBKS vs DCIPL 2021 Match 29: आयपीएलच्या (IPL) 29 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) नेतृत्वातील पंजाब किंग्सला (Punjab Kings) 7 विकेटने धोबीपछाड दिला आहे. पंजाब किंग्सने पहिले फलंदाजी करून दिलेल्या 167 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दिल्लीने 17.4 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून जबरदस्त विजय मिळवला आहे. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) संघाच्या विजयाचा नायक ठरला. धवनने सर्वाधिक 69 धावांची नाबाद खेळी केली. शिवाय, पृथ्वी शॉने 39 धावा आणि कर्णधार रिषभ पंतने 24 धावा केल्या. शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) 16 धावा करून नाबाद राहिला. दुसरीकडे, फलंदाजांप्रमाणे पंजाबचे गोलंदाजही आजच्या सामन्यात काही प्रभावी कामगिरी करू शकले नाही. रिले मेरेडिथ, क्रिस जॉर्डन आणि हरप्रीत ब्रारला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (PBKS vs DC IPL 2021: मयंक अग्रवाल-दीपक हुड्डा यांच्यातील मैदानावरील गोंधळ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल Watch Video)

पंजाबने दिलेल्या धावसंख्याचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीसाठी शिखर धवन-पृथ्वी शॉची जोडी मैदानात उतारतली. दोघांनी पुन्हा एकदा पॉवर-प्लेचा फायदा करून घेत पंजाब गोलंदाजांवर हल्ला चढवला. पण पॉवर प्लेच्या पुढील ओव्हरमध्ये 63 धावसंख्येवर हरप्रीत ब्रारने 7 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर पृथ्वी शॉचा त्रिफळा उडवला. त्यानंतर धवनने स्टिव्ह स्मिथच्या साथीने डाव पुढे नेला. दोघांनी आक्रमक पवित्रा घेत फलंदाजी सुरु केली. यादरम्यान, मेरेडिथने स्मिथला कॅच आऊट करत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. धवनने अवघ्या 35 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह शानदार अर्धशतक पूर्ण केलं. शिखरचे यंदाच्या मोसमातील हे तिसरं अर्धशतक ठरलं. संघ विजयाच्या जवळ असताना जॉर्डनने दिल्लीच्या पंतला मयंकच्या हाती झेलबाद केले. अखेरीस हेटमायर 2 षटकार व 1 चौकार खेचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

यापूर्वी, पंजाबसाठी कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या मयंकने 99 धावांची झुंजार खेळी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. अग्रवालने 58 चेंडूच्या आपल्या शानदार खेळी 8 चौकार आणि 4 षटकार ठोकले.  मयंक वगळता पदार्पणवीर डेविड मलानने 26 धावांची खेळी केली. दिल्ली कॅपिटल्ससाठी कगिसो रबाडा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. कगिसो रबाडाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.